नवी दिल्ली – भारतीय आयुर्विमा महामंडळाची (एलआयसी) आयडीबीआय बॅंकेमधील हिस्सेदारी ५१ टक्क्यांवर नेण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यामुळे आयडीबीआय बँकेवर ‘एलआयसी’ ची मालकी प्रस्थापित होणार आहे. याशिवाय, तीन खतनिर्मिती प्रकल्पांना व्याजमुक्त कर्ज देणे, यात महाराष्ट्रातील वाशीम आणि परभणीसह देशभरात १३ नवी केंद्रीय विद्यालये सुरू करणे या निर्णयांवरही मंत्रिमंडळाने आज शिक्कामोर्तब केले.
उत्तर प्रदेशातील गोरखपूर, झारखंडमधील सिंद्री आणि बिहारमधील बरौनी या खतनिर्मिती प्रकल्पांना १२५७.८२ कोटी रुपयांचे व्याजमुक्त कर्ज देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने आज घेतला. हिंदुस्थान कॉपर लिमिटेडमधील सरकारची हिस्सेदारी ७६ टक्क्यांवरून ६६.१३ टक्क्यांवर आणण्यासही मंजुरी दिली.
वाशीम, परभणीत केंद्रीय विद्यालये
देशात १३ नवी केंद्रीय विद्यालये सुरू केली जाणार आहेत. मध्य प्रदेशातील रतलाम येथे जवाहर नवोदय विद्यालय सुरू केले जाईल. महाराष्ट्रातील परभणी, वाशीम या दोन जिल्ह्यांसह उत्तर प्रदेश, मणिपूर, बिहार, झारखंड, तेलंगण आणि कर्नाटक या राज्यांमध्ये केंद्रीय विद्यालये सुरू होतील. सध्या १२ लाख विद्यार्थी केंद्रीय विद्यालयांमध्ये शिकत आहेत. वाढीव विद्यालयांमुळे विद्यार्थी संख्येत १३ हजारांनी वाढ होईल.