Skip to content Skip to footer

ट्रेड वॉर : चीनचं अमेरिकेला प्रत्युत्तर – आम्हीही कर लादणार

ट्रेड वॉर : अमेरिकेने ‘मेड इन चायना’ उत्पादनांवरचं आयात शुल्क मागे घेतलं नाही तर चीन 5,200 अमेरिकन उत्पादनांवर मोठा कर लागू करेल, असा धमकीवजा इशारा चीनने दिला आहे.

आधी जाहीर केलेल्या नव्या कर नियमांशिवाय आणखी 200 अब्ज डॉलर मूल्याच्या चिनी उत्पादनांवर अतिरिक्त कर लादणार असल्याचं अमेरिकेने जाहीर केल्यानंतर चीनच्या राज्य परिषदेने ही भूमिका घेतली आहे.

अमेरिका स्वतःहूनच दोन्ही महासत्तांमधला तणाव वाढवत असल्याचं चीनने म्हटलं आहे. त्यामुळे आम्ही आता जवळजवळ 60 अब्ज डॉलर किमतीच्या अमेरिकन उत्पादनांवर 5 ते 25 टक्के अतिरिक्त कर लावणार आहोत, असंही चीनने सांगितलं.

अमेरिकेनुसार चीनच्या “अन्याय्य” व्यापार धोरणांमुळेच त्यांच्यावर हा कर भार लादण्यात येत आहे. चीनमध्ये काही क्षेत्रांमध्ये परदेशी कंपन्यांना चिनी कंपन्यांबरोबर भागीदारी केल्यावरच व्यवसाय करण्याची परवानगी मिळते.

त्यामुळे अमेरिकेच्या कंपन्यांना त्याचा फटका बसतो, असा आरोप राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केला आहे. चीनचं व्यापारी धोरण हे अमेरिकेच्या हिताचं नाही. त्यामुळे व्यापारी तुट निर्माण होते, असं ते म्हणतात. “त्यामुळे पलटवार करण्याऐवजी चीनने आपलं व्यापार धोरण बदलावं,” असं व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव सॅरा सँडर्स म्हणाल्या.

ट्रेड वॉर

काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांमधली चर्चा फिसकटल्यानंतर हा ट्रेड वॉर सुरू झाला होता. ट्रंप यांनी चीनहून आयात होणाऱ्या स्टील उत्पादनांवर 25% तर अॅल्युमिनियम उत्पादनांवर 10 % आयात कर लावला होता. ट्रंप यांच्या निर्णयावर अमेरिका, युरोप, कॅनडा आणि मॅक्सिकोसह अनेक देशांनी टीका केली होती.

याची सुरुवात झाली तेव्हा झाली जेव्हा अमेरिकेने 50 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर आयात कर लादणार असल्याचं मार्चमध्ये जाहीर केलं. यापैकी 34 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवरील 25 टक्के कर 6 जुलैपासून लादण्यात आला. चीनने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर उर्वरित 16 डॉलरच्या कराचं प्रकरण प्रलंबित आहे. पण त्यानंतर ट्रंप यांनी सर्व 500 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर हा कर लादणार असल्याचं जाहीर केलं नि चीनचा पारा वाढला.

अमेरिका आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होतात. जुलैमध्येच अमेरिकेने आणखी 200 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर 10 टक्के कर लावणार असल्याची घोषणा केली, जो आकडा आता 25 टक्के करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यामुळे चीनने शुक्रवारी अमेरिकेच्या चर्मोद्योग, शेती, ऊर्जा आणि यंत्रोद्योगांसह अन्य क्षेत्रांवर कर लावण्याची घोषणा केली.अमेरिका या घोषणेला कसा प्रतिसाद देतो, त्यावरून हे कर कधी लावले जाणार, ते ठरवलं जाईल, असं चीनने सांगितलं.

Leave a comment

0.0/5