Skip to content Skip to footer

‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चे दिग्दर्शक विजय गुट्टे यांना अटक

मुंबई : अनुपम खेर यांच्या आगामी ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या सिनेमाचे दिग्दर्शक विजय गुट्टे यांना अटक करण्यात आली आहे. 34 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी जीएसटीच्या इंटेलिजन्स विंगने त्यांना बेड्या ठोकल्या. विजय गुट्टे यांना जीएसटी कायद्याच्या कलम 132 (1) (क) अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

विजय गुट्टे तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करत नसल्याचं सांगितलं जात आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून त्याची रवानगी 14 ऑगस्टपर्यंत आर्थर रोज जेलमध्ये करण्यात आली आहे.

विजय गुट्टे हे रत्नाकर गुट्टेंचे पुत्र आहेत. रत्नाकर गुट्टे यांच्यावरही 5500 कोटींच्या बँक घोटाळ्याचा आरोप आहे. परभणीतील गंगाखेड मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. रत्नाकर गुट्टेंवर घोटाळ्याचा आरोप करत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी त्यांना महाराष्ट्राचा ‘छोटा मोदी’ असल्याचं म्हटलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय यांची कंपनी व्हीआरजी डिजिटल कॉर्प प्रायव्हेट लिमिटेडने होरायझन आऊटसोर्स सॉल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून मिळालेल्या अॅनिमेशन आणि मॅनपॉवर सर्व्हिससाठी 34 कोटी रुपयांच्या जीएसटीची खोटी कागदपत्रे देऊन घेतल्याचा आरोप आहे. महत्त्वाची बाब म्हणजे विजय यांनी या कंपनीकडून कोणतीही सेवा घेतली नव्हती.

होरायझन नावाच्या या कंपनीविरोधात 170 कोटी रुपयांच्या खोट्या जीएसटी बिलाचा खटला सुरु आहे. ही  कंपनी अशाप्रकारे आपल्या ग्राहकांना बनावट जीएसटी बिल देऊन कोट्यवधींचा घोटाळा करत असे.

दिग्दर्शक म्हणून ‘द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा विजय गुट्टेंचा पहिला चित्रपट आहे. हा सिनेमा 21 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांचे माजी मीडिया सल्लागार संजय बारु यांच्या पुस्तकावर हा सिनेमा आधारित आहे. चित्रपटात मनमोहन सिंह यांची भूमिका अनुपम खेर साकारत आहेत. तर संजय बारु यांच्या भूमिकेत अक्षय खन्ना आणि दिव्या सेठ शाहर या मनमोहन सिंह यांच्या पत्नी गुरशरण कौर यांच्या भूमिकेत दिसतील.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5