Skip to content Skip to footer

६५०० गरजू रुग्णांना शिवसेनेची २५ कोटींची मदत

६५०० गरजू रुग्णांना शिवसेनेची २५ कोटींची मदत

महाराष्ट्रातील अनेक गरीब कुटुंबातील सदस्यांना गंभीर आजार झाल्यास उपचारासाठी लागणाऱ्या पैशाची सोय करणं त्या कुटुंबाला अवघड होऊन बसतं. महागड्या उपचार/शस्त्रक्रियेची गरज असताना त्यासाठी पैसे नाहीत पण रुग्णावर उपचार तर करायचे आहेत अशा बिकट परिस्थितीत असे कुटुंब होरपळून निघते. अशा वेळी कर्ज काढून किंवा नातेवाईक इत्यादींकडून पैसे जमवून उपचार करणं हा एक पर्याय असतो. पण हेही शक्य नसलेली अनेक गोरगरीब कुटुंब राज्यात आहेत. त्यांना अशावेळी फक्त प्रार्थना करणं हा एकच पर्याय उरलेला असतो. अनेकदा उपचाराअभावी रुग्णाची प्रकृती खालावते आणि रुग्ण दगावतोही. अशा परिस्थितीत असलेल्या गरजू कुटुंबाच्या मदतीसाठी शिवसेनेने शिवसेना भवन येथे वैद्यकीय मदत कक्ष सुरु केला आहे.

दीड वर्षांपूर्वी सुरु झालेल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून शिवसेनेने महाराष्ट्रातील जवळपास ६५०० गरजू रुग्णांना अंदाजे २५ कोटी रुपयांची मदत केली आहे. या कक्षाची स्थापना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून १७ नोव्हेंबर २०१७ रोजी करण्यात आली होती. या कक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या गरजू रुग्णांना मदत करण्यात येते. यात कॅन्सर, ब्रेन ट्युमर, किडनी/लिव्हर प्रत्यारोपण, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, जन्मतः कर्णबधिर मुलांची कॉकलियर इंप्लांट, जन्मतः लहान मुलाच्या हृदयाला छिद्र असल्यास केली जाणारी शस्त्रक्रिया यासारख्या दुर्धर व गंभीर आजारांचा समावेश आहे.

दुर्धर/गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मदत केली जाती तसेच योग्य उपचार घेण्यासंबंधी मार्गदर्शन केले जाते. प्रामुख्याने धर्मादाय रुग्णालयात निर्धन व आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असलेल्या खाटा गोर-गरीब-गरजूंना उपलब्ध करून देणे, धर्मादाय रुग्णालयात निकषात बसत असलेल्या रुग्णांना पूर्णपणे मोफत किंवा निम्म्या दरात शस्त्रक्रिया करण्यासाठी शिवसेनेच्या या मदत कक्षातून समन्वयाची भूमिका साधली जाते. तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या राज्यातील सर्व हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या शस्त्रक्रिया/उपचार होण्यासाठी पाठपुरावा केला जातो. याशिवाय संबंधित रुग्णालय, गरजू रुग्ण, आणि विविध ट्रस्ट्स यांच्यातील दुवा म्हणून शिवसेनेचा हा कक्ष काम करतो.

गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून ठाणे आणि पालघर जिल्ह्यात एकूण 28 महाआरोग्य शिबीरे घेण्यात आली, यात तब्बल 1 लाख 25 हजार पेक्षा अधिक रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. तसेच राज्यभरातील सुमारे 6500 पेक्षा अधिक गंभीर-महागड्या शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या गोरगरीब – गरजू रुग्णांना विविध ट्रस्टच्या माध्यमातून अंदाजे 25 कोटी रुपयांपर्यंतची मदत शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून संबंधित गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने पंतप्रधान वैद्यकीय सहाय्यता निधी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, श्री सिद्धीविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट, श्री लालबागचा राजा ट्रस्ट, श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट , जय गणेश ट्रस्ट, बीइंग ह्यूमन ट्रस्ट, कारो ट्रस्ट, कॅन्सर ऍड असोसिएशन, चाईल्ड हेल्प फौंडेशन आदी संस्थाचा प्रामुख्याने समावेश आहे.
राज्यातील गरीब-गरजू रुग्णांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाशी संपर्क साधल्यास त्यांना योग्य ती मदत करण्यात येईल असं शिवसेनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.

संपर्कासाठी पत्ता:

मंगेश नरसिंह चिवटे
कक्ष प्रमुख – शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष.
सदस्य – महात्मा फुले जन आरोग्य योजना, महाराष्ट्र राज्य.
भ्रमणध्वनी – 8275903030
कार्यालय – 022 – 25322525

गरजू रुग्णांसाठी आवश्यक कागदपत्रे:

-आधार कार्ड
-रेशन कार्ड (पिवळे/केशरी)
-उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार प्रमाणित वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयेच्या आत)
-हॉस्पिटल खर्चाचे अंदाजपत्रक
-(अपघातग्रस्त रूग्ण असल्यास पोलिसांचा MLC रिपोर्ट आवश्यक)

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मदत मिळण्यासहीत गरजू रुग्णांनी उपरोक्त कागदपत्रांसहित संपर्क साधावा.

 

शिवसेनेमुळे १ लाख ३१ हजार शेतकऱ्यांना २४६ कोटी पीक विमा रक्कम मिळणार

Leave a comment

0.0/5