खासदार राहुल शेवाळे आणि ‘श्री राधा फाऊंडेशन’ च्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त सन्मान
कोरोना काळालील लॉकडाऊन दरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासोबतच गरजू नागरिकांना विविध प्रकारची मदत करणाऱ्या चेंबूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती शालिनी शर्मा यांचा ‘कोरोना रणरागिणी’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. कोरोना संकटात उल्लेखनीय कार्य केलेल्या कतृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी, खासदार राहुल शेवाळे आणि ‘श्री राधा फाऊंडेशन’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात सोमवारी, राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या पोलीस अधिकारी श्रीमती शर्मा यांना चेंबूर पोलीस ठाण्यात हा पुरस्कार बहाल करण्यात आला.
यावेळी खासदार शेवाळे, ‘श्री राधा फाऊंडेशन’च्या अध्यक्षा सौ. कामिनी राहुल शेवाळे, विभागप्रमुख मंगेश सातमकर, विधानसभा संघटक निमिष भोसले, उपविभागप्रमुख राजेंद्र पोळ, यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. अशाच रीतीने नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसांत आरोग्य सेविका, महिला पोलीस, परिचारिका, डॉक्टर्स यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
गेल्या ३० वर्षांपासून पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, चेंबूर पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती शालिनी शर्मा यांना यंदाच्या ‘राष्ट्रपती’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच इंटरपोल आणि स्कॉटलंड पोलीस यार्ड येथल्या प्रशिक्षणाबद्दलही त्यांचा याआधी सन्मान करण्यात आला आहे. पोलीस दलात काम करताना, जनतेचं रक्षण आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याच्या कर्तव्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या श्रीमती शर्मा या एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून सुपरिचित आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने केलेले लॉकडाऊन यशस्वी करण्यात पोलीस दलाचे विशेष योगदान आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदावर कार्य करताना श्रीमती शालिनी शर्मा यांनी लॉकडाऊनच्या काळात नागपाडा आणि चेंबूर मधील परिस्थिती यशस्वीरीत्या हाताळली. आपले कर्तव्य बजावतानाच कोरोना संकटात गरजू नागरिकांना अन्नवाटप, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे तसेच परप्रांतीय मजुरांना सर्वतोपरी मदत करून शर्मा यांनी वर्दीतल्या माणुसकीचे अनोखे दर्शन घडवले. नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी समाजसेविका श्रीमती पद्मा कपूर, दुसऱ्या दिवशी आरोग्यसेविका श्रीमती मंगला जगताप यांचा सत्कार खासदार शेवाळे आणि ‘श्री राधा फाऊंडेशन’च्या वतीने करण्यात आला होता.