Skip to content Skip to footer

आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने, मीरा-भाईंदरला मिळणार १३५ एमएलडी पाणी

आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने, मीरा-भाईंदरला मिळणार १३५ एमएलडी पाणी

अनेक दिवस टंचाईग्रस्त असलेल्या मीरा-भाईंदरला १३५ एमएलडी पाणी मिळणार आहे. मीरा-भाईंदर करांसाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या विनंतीनुसार उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत मीरा-भाईंदर शहरासाठी पूर्ण १३५ एमएलडी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. तांत्रिक बाबींची पूर्तता करून येत्या काही दिवसात हे वाढीव पाणी मीरा भाईंदरला शहराला मिळेल, असे सांगण्यात आले. पुढच्या काही महिन्यात आणखी २० एमएलडी पाणी मीरा-भाईंदरला देण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

मीरा-भाईंदरमध्ये अपुऱ्या पाण्याने लोकांचे हाल होत आहेत. पाणी प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी होत होती. यासाठी काही दिवसापूर्वी आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची मंत्रालयात भेट घेऊन मीरा-भाईंदरच्या पाणी प्रश्नावर बैठक आयोजित करण्याची विनंती केली होती. त्यानुसार मंत्री सुभाष देसाई यांनी सोमवार १९ ऑक्टोबर २०२० रोजी मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती.

उद्योग विभागाच्या अंतर्गत ‘एमआयडीसी’च्या मंजूर कोट्यातून मीरा भाईंदरला पाणी पुरवले जाते. या बैठकीत मंत्री सुभाष देसाई यांच्याकडून मीरा भाईंदरच्या पाणी पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला.

मीरा भाईंदर शहराला ‘एमआयडीसी’कडून सध्या १०० एमएलडीच्या आसपास पाणी मिळत आहे. प्रत्यक्षात १३५ एमएलडी इतके पाण्याचे आरक्षण जलसंपदा विभागाकडून मीरा-भाईंदरसाठी करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण मंजूर असलेले १३५ एमएलडी पाणी मीरा-भाईंदरला द्यावे व त्याशिवाय अतिरिक्त किमान २५ एमएलडी पाणी मीरा-भाईंदर शहरासाठी मंजूर करावे. म्हणजेच त्याची मंजुरी व पाणी वितरित करण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी बैठकीत केली. त्याबाबत बैठकीत चर्चा झाली. मीरा भाईंदर शहराला वाढीव पाणी देणे अतिशय गरजेचे आहे. शहराची लोकसंख्या सतत वाढत आहे. त्यामुळे एमआयडीसीकडून मंजूर कोट्याप्रमाणे पाणी देण्याबाबत कार्यवाई करावी, अशा सूचना सुभाष देसाई यांनी दिल्या आहेत.

Leave a comment

0.0/5