Skip to content Skip to footer

बदलेल्या राजकीय गणितानंतर सेनेचे मुंबई मनपात वर्चस्व कायम


बदलेल्या राजकीय गणितानंतर सेनेचे मुंबई मनपात वर्चस्व कायम

मुंबई मनपात नुकत्याच पार पडलेल्या प्रभाग समितीच्या निवडणुकांमध्ये राज्यातील महाविकास आघाडी आता अप्रत्यक्षपणे सक्रिय झालेली पाहायला मिळत आहे. त्यात झालेल्या बदलाचे चित्र येत्या काळात पालिकेतील कामकाजावर दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आघाडीतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांमुळे शिवसेनेला महापालिकेतील आपले वर्चस्व पुन्हा एकदा दाखवून देता आले आहे.

पालिकेच्या चार वैधानिक आणि आठ विशेष समित्या व १७ प्रभाग समित्यांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर निवडणुकांना विशेष महत्व प्राप्त झाले होते. पालिकेतही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्तेत वाटा घेणार की एकमेकांविरोधात लढणार याबाबतच्या चर्चांना ऊत आला होता. त्यात होणाऱ्या निवडणुकीत भाजपाने सुद्धा सेनेविरोधात आपले उमेदवार उभे केले होते. मात्र पालिकेत आपले वर्चस्व टिकवण्यात सेनेला यश आले आहे.

राज्यात यापूर्वी सेना-भाजपची सत्ता असताना पालिकेत पहारेकऱ्यांच्या भूमिकेत असल्याचे भाजपने जाहीर केले होते. त्यामुळे वैधानिक व विशेष समित्यांच्या निवडणुका भाजपने लढवल्या नव्हत्या. यंदा मात्र राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे साहजिकच पालिकेतील राजकीय गणितही बदलली.

या बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेकडून जास्तीत जास्त जागा खेचण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मात्र शिवसेनेने रणनिती आखून इथेही भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. यापूर्वी भाजपकडे ९ व शिवसेनेकडे ८ प्रभाग समित्या होत्या. या वर्षी मात्र शिवसेनेकडे तब्बल १२ समित्या असून, भाजपला पाच समित्यांवरच समाधान मानावे लागले आहे.

Leave a comment

0.0/5