मनपा पाठोपाठ बेस्ट कर्मचाऱ्यांना १० हजार १०० रुपये दिवाळी बोनस जाहीर !
बृह्मुंबई महानगर पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त १५ हजार ५०० रुपये बोनस महापौर पेडणेकर यांनी जाहीर केला होता. आता त्या पाठोपाठ बेस्ट कर्मचाऱ्यांना सुद्धा दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे यंदाची बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी बेस्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनसची घोषणा केली आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना यंदा १० हजार १०० रुपयाचा बोनस मिळणार आहे. मुंबई महापालिकेकडून दोन दिवसांपूर्वीच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपये बोनस जाहीर झाला होता. त्यानंतर ‘बेस्ट’च्या कर्मचाऱ्यांनीही बोनससाठी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी बेस्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार १०० रुपये इतके सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे.
कोरोना संसर्गाच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी बेस्टने महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. या कठीण काळात अनेक बेस्ट कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचेही निष्पन्न झाले होते. या संसर्गाच्या कठीण काळात महत्वपूर्ण कामगिरीमुळे बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करण्यात आला आहे.