Skip to content Skip to footer

मुंबईतील सर्वात धोकादायक मार्गांमध्ये ‘बाळासाहेब ठाकरे फ्लायओव्हर’चा समावेश

मुंबईकरांसाठी कोणते रस्ते धोकादायक? वाचा सविस्तर

मुंबई हे प्रचंड गर्दीचे शहर आहे हे मुंबईकराला नव्याने सांगायची गरज नाही. ज्या ठिकाणी लोकसंख्या अधिक असते तिथे वाहनांची गर्दीदेखील तुलनेने जास्त असते. मुंबई आणि उपनगरातील अनेक ठिकाणी हमखास ट्रॅफिक जॅम लागलेला असतो. बरेचसे मार्गदेखील अपघातासाठी कुप्रसिद्ध आहेत. नुकत्याच एका अभ्यासाच्या माध्यमातून मुंबईतील सर्वात धोकादायक असलेले ३ मार्ग कोणते? याचा उलगडा झालेला आहे. २०१७ ते २०१९ या कालावधी दरम्यानच्या वाहतुकीच्या आधारावर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे या अहवालात सर्वात धोकादायक मार्गांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या जोगेश्वरीच्या फ्लायओव्हरचा समावेश करण्यात आला आहे.

द ब्लुमबर्ग फिलांथ्रोपीज यांनी मुंबई वाहतूक पोलिसांकडून मिळवलेल्या माहितीच्या आधारावर हा अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार, २०१७ ते २०१९ या कालावधीत इस्टर्न एक्सप्रेस हायवेला जोडणाऱ्या घाटकोपर-माहुल मार्गावर प्रति किलोमीटरमागे १४ जणांचा मृत्यू झाला आहे. हा मार्ग १.३६ किलोमीटर इतक्या लांबीचा आहे. तर १.१ किलोमीटर लांबीच्या जोगेश्वरीच्या बाळासाहेब ठाकरे फ्लायओव्हर मार्गावरही प्रति किलोमीटरमागे १४ मृत्यू झाल्याची माहिती आहे. घाटकोपर-माहुल मार्गावर २०१७ ते २०१९ या कालावधीत मृत्यू आणि गंभीर जखमी झालेल्या एकूण ५६ प्रकरणांची नोंद आहे. तर बाळासाहेब ठाकरे फ्लायओव्हर मार्गावर लोकांचा मृत्यू आणि गंभीर जखमी होण्याच्या एकूण ३८ प्रकरणांची नोंद आहे.

धोकादायक मार्गांच्या यादीतील तिसरा मार्ग आहे घाटकोपरचा वसंतदादा पाटील मार्ग. १.३ किलोमीटर लांबीच्या या मार्गावर प्रति किलोमीटरमागे आठ मृत्यू आणि १६ गंभीर जखमींची प्रकरणे आहेत. २०१७ ते २०१९ या कालावधीत या मार्गावर एकूण ३२ मृत्यू आणि गंभीर जखमींच्या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

याशिवाय, या कालावधीत २५.३ किलोमीटर लांबीच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ३४६, २३.५ किमी लांबीच्या इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर २४२, ९.१ किमी लांबीच्या सायन-पनवेल मार्गावर १०८, ६.४५ किमी लांबीच्या सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडवर ५७, ७.१ किमी लांबीच्या आरे कॉलनी मार्गावर ४७, ६.२ किमी लांबीच्या गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवर ४० आणि २.५ किमी लांबीच्या जे.जे. फ्लायओव्हरवर ३८ मृत्यूच्या प्रकरणाची नोंद झाल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a comment

0.0/5