Skip to content Skip to footer

“आपले व्यक्तिमत्व, समाजकारण…,” राज्यपालांकडून एकनाथ खडसेंचं कौतुक; राजकीय वर्तुळात चर्चा

विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त जागांसाठी पाठवण्यात आलेल्या नावांमध्ये खडसेंचाही समावेश

भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसेंचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कौतुक केलं आहे. विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त जागांसाठी पाठवण्यात आलेल्या नावांमध्ये एकनाथ खडसे यांचाही समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसेंच्या नावाची शिफारस केली आहे. राज्यपालांनी अद्याप त्यासंबंधीचा निर्णय जाहीर केलेला नाही. त्यातच राज्यपालांनी एकनाथ खडसे यांचं कौतुक केल्याने राजकीय वर्तुळाच चर्चा रंगली आहे.

एकनाथ खडसे यांनी सुनील नेवे लिखित त्यांचं आत्मचरित्र ‘जनसेवा मानबिंदू एकनाथराव खडसे’ या पुस्तकाची प्रत भगतसिंह कोश्यारी यांना पाठवली होती. भगतसिंह कोश्यारी यांनी पुस्तकावर अभिप्राय लिहून पाठवला असून यामध्ये एकनाथ खडसेंच्या राजकीय, सामाजिक आणि संसदीय कारकीर्दीचं कौतुक केलं आहे.

राज्यपालांनी काय म्हटलं आहे –
“जनसेवा मानबिंदू एकनाथराव खडसे हा डॉ. सुनिल नेवे यांनी लिहिलेला ग्रंथ प्राप्त झाला. पुस्तकाच्या माध्यमातून आपले व्यक्तीमत्व, आपले समाजकारण, राजकारण, संसदीय कार्य, वैचारिक भूमिका तसेच विधानसभा सदस्य म्हणून योगदान यांसह आपल्या व्यापक सेवाकार्य यांचा अभ्यासपूर्ण आलेख मांडला आहे. यानिमित्त मी आपले हार्दिक अभिनंदन करतो आणि आपणास सुयश चिंतितो”, असा अभिप्राय राज्यपालांनी दिला आहे. हा अभिप्राय १ ऑक्टोबरला पाठवण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार १२ नावांची यादी बंद पाकिटात राज्यपालांना सादर करण्यात आली आहे. यामध्ये एकनाथ खडसे यांचाही समावेश आहे.

ती १२ नावं कोणती –
राष्ट्रवादी – एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, गायक आनंद शिंदे
शिवसेना – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी
काँग्रेस – सचिन सावंत, मुझ्झफर हुसेन, रजनी पाटील आणि गायक अनिरुद्ध वनकर

Leave a comment

0.0/5