Skip to content Skip to footer

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सामान्यांसाठी उघडणार लोकलचे दरवाजे?

मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली महत्त्वाची माहिती

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सामान्यांसाठी लोकल ट्रेन सेवा सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत. अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. मार्च महिन्यापासून मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा सामान्यांसाठी बंद आहे. लोकल ट्रेन अनलॉकमध्ये सुरु करण्यात आल्या. मात्र त्या फक्त अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठीच. त्यानंतर नवरात्रात महिलांना लोकल प्रवासासाठी मुभा देण्यात आली. लोकल सरसकट सगळ्यांसाठी कधी होणार हा प्रश्न उपस्थित होत होता. त्याबाबत आता विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली आहे.

काय म्हणाले आहेत विजय वडेट्टीवार?

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुंबईची लोकल ट्रेन सेवा सरसकट सगळ्यांसाठी सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठ दिवसांमध्ये लोकल सेवा सरसकट सगळ्यांसाठी सुरु करण्यात यावी असा विचार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. ”

मार्च महिन्यात जेव्हा करोनाचा प्रसार होऊ नये म्हणून लॉकडाउन करण्यात आला तेव्हा मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली. त्यानंतर हळूहळू अनलॉकमध्ये लोकल आधी अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी, त्यानंतर वकिलांसाठी आणि त्यानंतर महिलांसाठी सुरु करण्यात आली. करोना प्रतिबंधक नियमांचं पालन करुन लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात जेव्हा मुंबई लोकल महिलांसाठी सुरु करण्यात आली तेव्हा लोकल सरसकट सगळ्यांसाठी कधी सुरु होणार हा प्रश्न विचारला जात होता. लोकल सगळ्यांसाठी सुरु करण्याबाबत राज्य सरकारने रेल्वे मंत्रालयाला पत्रंही पाठवली होती. मात्र त्यावर काही उत्तर आलं नाही. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरु करण्यासाठी सकारात्मक आहेत असं समजतं आहे.

Leave a comment

0.0/5