पुणे – शहरातील दहा महाविद्यालयांमध्ये डेंगी सह जापनीज मेंदूज्वर आणि हत्तीरोगाचा संसर्ग करणारे डास आढळल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. नामांकित वैद्यकीयपासून अभियांत्रिकीपर्यंतच्या महाविद्यालयांचा त्यात समावेश आहे.
शहरातील सोसायट्या या डासांचे आगार बनल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. 65 टक्के डेंगीचे उत्पत्तीस्थान सोसायट्या आहेत. त्यामुळे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने घरोघरी सर्वेक्षण सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील महाविद्यालयांत केलेल्या पाहणीतून ही माहिती पुढे आली आहे.
https://maharashtrabulletin.com/dengue-prevention-health-pune/
पुण्यात गेल्या महिनाभरापासून डेंगी आणि चिकूनगुनिच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जानेवारीपासून शहरात डेंगीच्या संशयित रुग्णांची संख्या 834 पर्यंत वाढली असून, त्यापैकी 220 रुग्णांना डेंगीचे निदान झाले आहे. गेल्या 21 दिवसांमध्ये 134 रुग्णांना डेंगी झाला आहे. गेल्या आठ महिन्यांत चिकूनगुनिच्या रुग्णांची संख्या 182 पर्यंत पोचली आहे. त्यामुळे डेंगीच्या डासांची उत्पत्तीस्थाने शोधून ती नष्ट करण्याची मोहीम महापालिकेच्या आरोग्य विभागाने हाती घेतली आहे.
महाविद्यालयांमधील कीटकशास्त्रीय सर्वेक्षणाचा निष्कर्ष शहरातील 15 वैद्यकीय महाविद्यालयांमधून सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी दहा महाविद्यालयांमध्ये एडीस इजिप्ती हा डेंगी फैलावणारा आणि जापनीज मेंदूज्वर व हत्तीरोगाच्या जंतूंचा प्रसार करणारा क्युलेक्स हा डास सापडला. यात नर डासांच्या तुलनेत मादींची संख्या मोठी जास्त असल्याचे निरीक्षण कीटकतज्ज्ञांनी नोंदविले आहे.
कुठे आढळले डास?
सिंटेक्स टाकी, चेंबर, पाण्याची टाकी, पावसाळी जाळी, बादल्या, गच्चीवरील पाण्याची टाकी आणि भंगार साहित्यात पावसाचे पाणी साचले होते. या स्वच्छ पाण्यावर डासांनी अंडी घातली होती. त्यातून डासांची उत्पत्ती होत असल्याचे दिसून आले.
काय आहे धोका?
शहरात सध्या स्वाइन फ्लू, डेंगी याच्यासह विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये येणाऱ्या मुला-मुलींना डेंगीचा संसर्ग होण्याचा धोका आहे. महाविद्यालयासारख्या गजबजलेल्या ठिकाणी डेंगीच्या डासांची पैदास वाढणे हे सार्वजनिक आरोग्याला धोकादायक आहे.
डेंगीचे डास आढळलेल्या महाविद्यालयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच तेथील डासोत्पत्तीची स्थळेदेखील नष्ट केली आहेत. त्यापैकी काही महाविद्यालयांना दंड ठोठावण्यात आला आहे.
– डॉ. कल्पना बळीवंत, विभागप्रमुख, कीटकजन्य रोग नियंत्रण विभाग, पुणे महापालिका
महाविद्यालयाला नोटीस मिळाली आहे. त्या आधारावर महाविद्यालय आणि ससून रुग्णालय परिसरात डासांची उत्पत्ती होणार नाही, यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
– डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय
अधिक माहितीसाठी