Skip to content Skip to footer

पुण्यात शिवाजीनगर न्यायालयाजवळ गोळीबार ?

पुणे : शिवाजीनगर न्यायालयाजवळील कामगार पुतळ्याजवळ गुरूवारी दुपारी 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन पाहणी केली, मात्र घटनास्थळी रिकामी काडतुसे किंवा गोळीबार झाल्याच्या खुना आढळून आल्या नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

कामगार पुतळ्याजवळ गोळीबार झाला असल्याची खबर गुरूवारी पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर नियंत्रण कक्षातून शिवाजीनगर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पिंपरी-चिंचवड येथील एका सराईत गुन्हेगारांच्या टोळीतील गुन्हेगारांनी हवेत गोळीबार केल्याची माहिती एका व्यक्तीने पोलिसांना दिली. संबंधीत व्यक्तीला सोबत घेऊन पोलिसांनी कामगार पुतळा परिसरातील रहिवासी, स्टॉलधारक, रिक्षाचालक यांच्याकडे चौकशी केली. मात्र गोळीबार झाल्याचे कोणी सांगितले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

याविषयी शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब कोपनर म्हणाले, “गोळीबाराची माहिती मिळाल्यापासून शिवाजीनगर पोलिसांसह व गुन्हे शाखेचे पोलिस घटनास्थळी तपास करत आहेत. हवेत गोळीबार झाला, एवढीच माहिती उपलब्ध झाली आहे. त्यादृष्टीने आम्ही तपास करत आहोत.”

Leave a comment

0.0/5