Skip to content Skip to footer

.अवघ्या 16 मिनिटात विनासाहित्य लिंगाणा सर !

एमपीसी न्यूज- ”लिंगाणा ” हा शब्द ऐकला तरी कान सावध होतात. जातिवंत सह्यभटके व आताचे ट्रेकर्सच्या भाषेत लिंंगाणा म्हणजे काळजात धडकी भरवणारा सह्याद्रीच्या रांगेतील एक सुळका, पण आमच्यासाठी हा लिंंगाणा म्हणजे पृथ्वीच्या उदरातील तप्त ज्वालामुखीच्या उद्रेखातुन शिवलिंगाच्या आकाराचे तयार झालेले एक आव्हानात्मक शिखर..! हे शिखर कोणत्याही प्रस्तरारोहणाच्या साहित्याचा वापर न करता सुरक्षितरित्या सर केले ते बा रायगड परिवार संस्थेच्या कोल्हापूर जिल्ह्यातील करनूर गावातील सागर विजय नलवडे यांनी.

प्रत्येक सह्याद्री भटक्याचं स्वप्न असलेला लिंगाणा सुळका. याच नाव जरी ऐकलं तरी भल्या-भल्या ट्रेकर्सची भीतीने गाळण होते, हा सुळका सर करण्यासाठी प्रस्तरारोहणाचे तंत्र आणि त्याचे साहित्य आवश्यक आहे. विना सुरक्षा साहित्य लिंगाणा सर करायचे स्वप्नात जरी आणले तरी अंगावर काटा येईल. याला गवसणी घालायचं म्हणजे येरागबाळ्याच काम नाही. याला जिद्दीचा, कसलेल्या हाडामासाचा जातीवंतच पाहिजे. सागर विजय नलवडे यांनी गुरुवारी (दि 21) शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराज जन्मोत्सवाचे औचित्य साधत सह्याद्रीतील अवघड असा लिंगाणा सुळका अवघ्या 16 मिनिटे 40 सेकंद या विक्रमी वेळेत सर केला.

सागर नलवडे यांनी जवळ जवळ 45- 50 वेळा लिंगाण्याची चढाई उतराई केली. याच लिंगाणा मोहिमांमधून सागरने लिंगाण्याचा खडा न खडा अभ्यास केला. कोणता टप्पा कसा चढावा. पकडण्याची जागा कुठे कुठे आहेत याचा बारकाईने अभ्यास केला. या मोहीम केल्यानंतर त्याला जेव्हा वाटले कि मी विना साहित्य लिंगाणा सर करण्यास पात्र झालोय तेव्हा त्याने हा धाडसी निर्णय घेतला आणि काल गुरुवारी त्याच्या प्रयत्नांना यश आले.

या मोहिमेसाठी सागर नलावडे यांना मार्गदर्शक अरुण पाटील, संजय करपे याचे मार्गदर्शन लाभले व सर्व बा रायगड परिवारची कोअर टिम याची मोलाची साथ मिळाली त्याचबरोबर पत्नी तेजस्वी व आई शोभा यांच्या शुभेच्छा व आशीर्वाद लाभले.

सागर नलवडे यांनी रायगडाचा वाघ दरवाजा दोन वर्षापूर्वी तो दरवाजा विना साहित्य उतरला आणि परत सुरक्षितरित्या चढून आले होते. तेव्हा तिथे बरेच तोफगोळ्याचे अवशेष सापडले होते. अशा बऱ्याच धाडसी मोहिमा त्यांनी यशस्वी करुन दाखवल्या आहेत. मात्र अभ्यास केल्याशिवाय असे वेड साहस करू नका असे नलवडे यांनी आवर्जून सांगितले.

Leave a comment

0.0/5