गेल्या वर्षी नाेव्हेंबर मध्ये पुण्यातील शिवाजीनगर भागातील पाटील इस्टेट झाेपडपट्टीला लागलेल्या आगीत इथली अनेक घरं जळून खाक झाली हाेती. या आगीमुळे शेकडाे लाेक बेघर झाले हाेते. काल रात्री 12 च्या सुमारास याच झाेपडपट्टीत पुन्हा आग लागली. या आगीत 3 झाेपड्या जळून खाक झाल्या तर पाच ते सात झाेपड्यांना आगीची झळ पाेहचली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार साेमवारी रात्री 12 च्या सुमारास पाटील इस्टेट झाेपडपट्टी येथे आग लागल्याचा काॅल अग्निशमन दलाला आला. त्यानंतर कसबा, एरंडवणा, खडकी या स्टेशनवरुन 7 अग्निशमन दलाच्या गाड्या, 3 देवदूत आणि 4 वाॅटर टॅंकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाटील इस्टेट झाेपडपट्टी येथील सात घरांना आगीने वेढले हाेते. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत 3 घरे संपूर्ण जळून खाक झाली. तर पाच चे सात घरांना आगीची झळ पाेहचली. येथील नागरिक झाेपलेले असताना माेठा आवाज झाल्याने काय झाले ते पाहण्यासाठी घराबाहेर पडले. तेव्हा आगीने राैद्र रुप धारण केले हाेते. नागरिकांनी सतर्कता दाखवत घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढले त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
पाटील इस्टेट येथील आग विझवल्यानंतर लगेचेच शिवाजीनगर येथील एका गाेडाऊनला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. लगेचच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाल्याने काही मिनिटातच आग लगेचच आटाेक्यात आणता आली. सुदैवाने या गोडाऊन मध्ये कुणीही राहत नसून विशेष किमती समान देखील नसल्याने विशेष वित्त हानी झाली नसल्याचे नागरिकांनी सांगितले. ही आग विजेच्या शॉर्ट सर्किट मुळेच लागली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे परंतु अग्निशामक दलाकडून त्याला दुजोरा देण्यात आलेला नाही. या गोडाऊन मध्ये भंगार, कागदी गठ्ठे आणि जुने फर्निचर आशा प्रकारच समान असल्याची माहिती अग्निशामक दलाकडून देण्यात आली.