पुण्याची गुलजार हवा केव्हाच इतिहाजमा झाली आहे, याचा पत्ता पुणेकरांना असेल. पाच सिगारेट ओढल्यानंतर जेवढा धूर फुप्फुसात जाईल तेवढाच धूर स्वत: धुम्रपान न करणाऱ्या प्रत्येक पुणेकरांच्या फुप्फुसात दररोज जात आहे. वाहनांकडून ओकल्या जाणाऱ्या धुराची ही किमया आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वायू प्रदुषण मोजण्यासाठी चार ठिकाणी यंत्रे बसविण्यात आलेली आहेत. स्वारगेट येथील केंद्रावर व्यावसायिक, नळस्टॉप चौकातील केंद्रावर रहिवासी भागातील, भोसरी येथील केंद्रावर औद्योगिक आणि पिंपरी-चिंचवड येथील केंद्रावर मिश्र स्वरुपाचे प्रदुषण ही यंत्रे मोजतात. या केंद्रांवर १९९४ पासून प्रदुषणाची पातळी मोजली जात असून दर चार तासांच्या प्रदुषणाची नोंद ठेवली जाते. त्यावरुन पुण्यातल्या वायू प्रदूषणाची ही भीषण स्थिती समोर आली आहे.
‘क्लिन एअर प्रोग्रॅम’साठी पुण्याची निवड करण्यात आली. ‘द एनर्जी अँड रिसोर्स इन्सिट्यूट’ या संस्थेने देशातील ‘मेट्रो सिटीं’च्या केलेल्या अभ्यासात सर्वाधिक प्रदुषित पाच रस्त्यांमध्ये कर्वे रस्त्याचा समावेश असल्याचे समोर आले. हवेतील कार्बन डाय ऑक्साईडच्या पातळीबाबत जागतिक स्तरावरील मानक हे ३५० पीपीएम (पार्ट पर मिलियन) असं आहे. परंतू, पुण्याची स्थिती ४०८ पीपीएम एवढी असून हे प्रमाण मानकापेक्षा १५ टक्के अधिक आहे. त्यामुळे श्वसन विकारांमध्ये वाढ होऊ लागली आहे.
पर्यावरण मंत्रालयाने राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यात पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, कोल्हापूर आणि सांगलीचा समावेश आहे. या अंतर्गत हवेतील कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सूक्ष्म धूलिकण (पीएम १०) आणि अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम २.५) हे मोजले जात आहे. पीएम १० चा प्राथमिक स्त्रोत डिझेल आहे. पीएम १० चे प्रमाण दिवाळीच्या दिवसांमध्ये फटाक्यांमुळे दुप्पट होते. हे सर्व आकडे धोकादायक पातळीच्या वरच आहेत. २०२२ पर्यंत हे प्रदुषण ३५ टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. परंतू, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय उदासिनता पाहता हे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढण्याचीच अधिक चिंता आहे.
सूक्ष्म धूलिकण (पीएम १०) आणि अतिसूक्ष्म धूलीकण (पीएम २.५) म्हणजेच धूलिकण पदार्थांचा विचार करताना प्रदुषणाचा स्त्रोत आणि संवाहक यांचा विचार केला जातो. म्हणजे प्रदुषणाचे वहन कसे होते ते समजते. वाऱ्याची गती आणि दिशा लक्षात घेतली तर हे प्रदुषण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात खालीच साचून राहते. हा काळ थंडीचा असल्याने लोक व्यायामासाठी बाहेर पडतात; परंतू नकळत त्यांची गाठ प्रदुषणाशी पडते. वाहनांच्या धुरातल्या वायुंंमुळे अधिक प्रदुषण होत आहे. लखनौ, भोपाळ, कोची आणि विजयवाडा या चार शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या ज्वलनामधून जितकी ऊर्जा वापरली जाते तेवढी ऊर्जा एकटं पुणे शहर वापरत आहे