महापालिकेकडे नोंदणी असलेली विविध रूग्णालये, दवाखाने, रक्त पेढया पॅथॉलॉजिक लॅब यांच्याकडून प्रतिदिन ३ ते ४ मेट्रिक टन इतका जैव वैद्यकीय कचरा घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे जमा होत असून, त्यातील 1.20 टन कच-यावर पुनप्रक्रिया क्रिया केली जात आहे. मात्र, अद्यापही अनेक दवाखान्यांची नोंदणी महापालिकेकडे झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
रोजच्या वापरातून उरलेल्या निरूपयोगी वस्तूंचा साठा म्हणजे घनकचरा. सध्याच्या काळात ई-कचरा प्रमाणेच जैव वैद्यकीय कचरा महत्वपूर्ण मानला जातो. या कच-याची योग्य विल्हेवाट न लावल्यास आरोग्याच्या दृष्टीने ते अत्यंत घातक ठरू शकते. या जैव वैद्यकीय कच-यामध्ये वापरलेली इंजेक्शन्स, मलमपट्टी केलेले कापसाचे बोळे, शस्त्रक्रिया करून काढलेले भाग, बँडेजेस, रक्त, थुंकी, लघवीचे नमुने, औषधे यांचा समावेश होतो.
या कच-यामध्ये अनेक प्रकारचे रोगजंतू, विषाणू असतात. त्यादृष्टीने योग्य ती पावले उचलीत महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने जैव वैद्यकीय कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली असून, पास्को एनव्हायर्मेंटल सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीला काम देण्यात आले असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
महापालिकेकडे जवळपास 750 रूग्णालये , 3500 क्लिनिक, 17 ब्लड बँक, 315 पँथलँब यांची नोंदणी आहे. त्यांच्याकडून जैव वैद्यकीय कचरा पिवळ्या ( ज्वलनभट्टीत जाणारा कचरा), लाल ( थ्रेडिंग, रिसायकलिंग व डंपिंगला जाणारा कचरा), व पांढरा (धारदार, काचेचा कचरा) पिशव्यांमध्ये गोळा करण्यात येतो. इंसिनरेशन प्रक्रियेमध्ये 1800 डिग्री सेंटीग्रेडला ज्वलनभट्टीमध्ये विषारी जीवाणू व जंतुसंसर्ग नष्ट करण्यासाठी हा कचरा जाळला जातो.
नायडू रूग्णालयाच्या जवळील कैलास स्मशानभूमी परिसरात जैव वैद्यकीय कच-याची विल्हेवाट लावली जाते. प्रतिदिन 3800 ते 4000 किलो कचरा गोळा केला जातो. हा कचरा संकलित करण्यासाठी 7 जीपीएस यंत्रणायुक्त वाहनांची सोय करण्यात आली आहे. नोंदणीकृत रूग्णालय दवाखाने, रक्त पेढया,पॅथॉलॉजिकल लॅब यांच्याकडूनच हा वैद्यकीय कचरा उचलला जातो. अद्यापही अनेक दवाखान्यांची महापालिकेकडे नोंदणी झालेली नसल्याचे आरोग्य विभागाच्या सहायक वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा नाईक यांनी सांगितले.