Skip to content Skip to footer

पुण्यात लवकरच महाराणा प्रताप यांचा अश्वारुढ पुतळा : मुक्ता टिळक

शहरातील रजपूत समाजाचे प्रश्न सोडवण्याचे काम महानगरपालिकेकडून केले जाईल. महाराणा प्रताप यांचे नाव असलेल्या दूधभट्टीच्या ठिकाणी महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यासंदर्भात तेथील नगरसेवकांनी प्रस्ताव दिला आहे. तो प्रस्ताव पक्षनेते सभेसमोरून कला संचलनालयाकडे गेला आहे. त्याची मान्यता आल्यावर हा पुतळा लवकरात लवकर बसवण्यात येईल. तसेच महाराणा प्रताप बागेची देखील आम्ही अधिक चांगली नैसर्गिक पुनर्रचना करत आहोत. त्याचा एक मास्टर प्लॅन या वर्षात तयार करून पुढील दोन वर्षांमध्ये या ठिकाणी अधिकाधिक लोकांना चांगल्या सुविधा कशा मिळतील हे पाहणार आहोत, असे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले..

समस्त राजपुत समाज अंकित राजपुत सोशल वॉरिअर्स या संस्थेने महाराणा प्रताप यांच्या ४७९ व्या जयंतीनिमित्त मिरवणुकीचा खर्च टाळून पुणे जिल्हयातील दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या चारा छावण्यांना चारा वाटप करण्यासाठी पुढाकार घेतला. या उपक्रमाचा शुभारंभ टिळक यांच्या हस्ते थोरले बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान येथे करण्यात आला. कार्यक्रमाला अ‍ॅड. प्रताप परदेशी, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर रजपुत, शैलेश बढाई, गोपी पवार, राजेंद्र परदेशी, सुरेंद्र काची, मनीष साळुंके, सुनील परदेशी, सुरेश ठाकुर, रतन किराड, शेखर हराडे, सोमनाथ परदेशी, गोपीनाथ परदेशी उपस्थित होते.

पुणे परिसरातील दौंड, शिरुर या दुष्काळी भागातील चारा छावण्यांना दहा ट्रक चारा वाटप केले जाणार आहे. तसेच यावेळी हिंदू राजपूत समाज, पुणे अंतर्गत राजपूत महिला युवक मंडळातर्फे गणेश पेठेपासून महाराणाप्रताप उद्यानापर्यंत बाईक रॅलीचे आयोजन केले होते. यामध्ये ५५ महिलांनी सहभाग घेतला होता.
टिळक म्हणाल्या, ‘शौर्य, धैर्य, त्याग, भक्ती यांचे प्रतीक असलेले आणि भारताचे भूषण असलेले असे महाराणा प्रताप. त्यांचे कष्ट आणि त्याग याची आठवण आपण ठेवायची आहे. आपल्या देशातील प्रत्येक सैनिक हा महाराणा प्रताप आहे. कारण तोच आदर्श, देशाप्रती असलेली भावना आणि प्राण जातील पण माज्या देशाची इंचभर जमीन देखील शत्रूच्या ताब्यात जाणार नाही. असा आदर्श महाराणा प्रताप यांनी घालून दिला, याचेच पालन आपला प्रत्येक सैनिक करतो.’

Leave a comment

0.0/5