Skip to content Skip to footer

आर्थिक मंदीच्या नावाखाली पर्मनंट कामगारांना घरी बसवलं, पुण्यातील कंपनीचा प्रताप

पुण्यातील नामांकित कल्याणी ग्रुप ऑफ कंपनीजच्या टेक्नोवेल्ड या उपकंपनीने आर्थिक मंदीच्या नावाखाली 53 पर्मनंट कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे या कामगारांच्या कुटुंबियांनी गेल्या 13 दिवसांपासून भारत फोर्ज कंपनीच्या गेटबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलंय. पण तरीही कल्याणी उद्योगसमुह या पीडित कामगारांची साधी दखलही घेत नाहीये. या पर्मनंट कामगारांची फक्त कपंन्यांचे नावं बदलून फसवणूक करण्यात आली आहे.

पुण्यातील नामांकित कल्याणी ग्रुपची भारत फोर्ज कंपनी. याच कंपनीच्या वेल्डिंग वर्कशॉपमध्ये गेली पंधरा वर्षे काम करणाऱ्या 53 कामगारांना मंदीच्या नावाखाली तडकाफडकी काढून टाकण्यात आलंय. त्यामुळे रस्त्यावर आलेल्या या कामगारांनी आपल्या बायकामुलांसोबत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केलंय. गेल्या 13 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे पण कंपनीने त्यांची साधी दखलही घेतलेली नाही. त्यामुळे हे कामगार पुरते हवालदील बनलेत. नवऱ्याची पर्मनंट नोकरी गेल्यानं या कामगारांच्या महिलांना आपल्या व्यथा सांगताना अश्रू अनावर झालेत.कारण धन्याचा जगारच बंद झालाय, मुलांची शाळाही बुडतेय.

आंदोलक कामगारांची व्यथा घेऊन आम्ही व्यवस्थापनाकडे गेलो असता कंपनीचे संचालक सुरेश राजनाळे यांनी सरळ आर्थिक मंदीचं कारण पुढे केलं. पण हे कारण सांगतानाच या कामगारांची कंपनी बदलल्याने आता यांचा भारत फोर्जच्या कल्याणी ग्रुप ऑफ कंपनीशी कोणताही संबंध नसल्याचा देखील दावा केलाय.

कंपनी व्यवस्थापनाचा हा दावा आम्ही पुन्हा कामगारांसमोर घेऊन गेलो असता त्यांनी आपली व्यवस्थापनाने फक्त कंपन्यांची नावं बदलून नेमकी कशी फसवणूक केली. हे ओळखपत्रांसह दाखवलं.आता या तानाजी लोणकर या एकाच कामगाराची ही चार वेगवेगळ्या कंपन्यांची आयकार्ड देण्यात आली आहेत. ते जॉईन झाले कल्याणी थर्मलमध्ये तिथेच ते पर्मंनटही झाले नंतर त्यांना कल्याणी टेक्नोफोर्जमध्ये टाकण्यात आलं. पुढे 2014 मध्ये याच 53 कामगारांना कल्याणी टेक्नोवेल्ड ही कंत्राटी उपकंपनीत ट्रान्सफर करण्यात आलं. आणि आता तर थेट कंपनीच्या बाहेरच.

बरं आर्थिक मंदी म्हणावं तर आता पर्मनंट कामगारांच्या जागी आता कंत्राटी कामगारांना भरून कंपनीचं प्रॉडक्शनही जोरात सुरू आहे. थोडक्यात या कायद्याच्या पळवाटांचा खुबीने वापर करत कल्याणी ग्रुप ऑफ कंपनीजने या पर्मनंट कामगारांना व्यवस्थितपणे गेटबाहेरचा रस्ता दाखवलाय. म्हणूनच आता थेट कंपनी मालक अमित कल्याणी यांनीच आम्हाला न्याय द्यावा, अशी या कामगारांची मागणी आहे. भारतफोर्जचे सर्वेसर्वा बाबा कल्याणी तरी या पीडित कामगारांना न्याय देतात का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Leave a comment

0.0/5