Skip to content Skip to footer

उदयनराजे पदवीधर निवडणूक प्रचारापासून दूर

संग्राम देशमुखांना टाळत कोकाटेंची भेट

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या प्रचारापासून खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वत:ला दूर ठेवले आहे. महाविकास आघाडी व भाजपच्या नेते प्रचारात उतरून आरोप प्रत्यारोपात गुंतले असताना उदयनराजे मात्र आजपर्यंत कुठेही प्रचारात सहभागी झालेले दिसत नाहीत. उलट पक्षाच्या उमेदवाराची भेट टाळणारे उदयनराजेंना या लढतीतील अपक्ष उमेदवार श्रीमंत कोकाटे येऊन भेटल्यामुळे याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

सातारा जिल्ह्यत पदवीधर व शिक्षक निवडणुकीचा प्रचार जोर धरला आहे. भाजपसह महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेत दररोज मेळावे, बैठका, मतदारांच्या गाठीभेटी यावर उमेदवारांनी भर दिला आहे. महाविकास आघाडीचे नेते व भाजपच्या नेत्यांत कलगीतुरा रंगला आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अजिंक्यतारा कारखान्यावर प्रचार सभा घेत प्रचारात थेट सहभाग नोंदवत संग्रामसिंह देशमुख यांना मताधिक्य देण्याचे आश्वासन दिले आहे. या सर्व परिस्थितीत उदयनराजे हे मात्र प्रचारापासून दूरच आहेत.

अपक्ष उमेदवाराच्या भेटीवरून चर्चा

दोन दिवसांपूर्वी भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख उदयनराजेंची भेट घेण्यासाठी साताऱ्यात आले पण त्यांची भेट होऊ शकली नाही. परंतु मंगळवारी पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार श्रीमंत कोकाटे यांनी उदयनराजेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी उदयनराजेंनी कोकाटे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. साताऱ्यात आलेल्या पक्षाच्या उमेदवाराची भेट न घेणारे उदयनराजे या लढतीतील एका अपक्ष उमेदवाराला भेटतात यावरून विविध मतमतांतरे सुरू झाली आहेत.

Leave a comment

0.0/5