Skip to content Skip to footer

उद्धवनीती यशस्वी:महाराष्ट्रातील राजकारणात शिवसेना टॉपवर!

उद्धवनीती यशस्वी:महाराष्ट्रातील राजकारणात शिवसेना टॉपवर!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नेतृत्वशैली उद्धवनीती म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणानंतर त्यांनी पक्षप्रमुख पदाची सूत्रं हाती घेतली. तेंव्हापासून आजपर्यंत शिवसेनेच्या वाटचालीत अनेक स्थित्यंतरं आली. मात्र उद्धव ठाकरे यांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आज शिवसेना टॉपवर असल्याचं दिसतं. शिवसेनाप्रमुखांच्या पश्चात शिवसेनेचं काय होणार? असा प्रश्न विचारणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी आपल्या कृतीतून उत्तर दिलं आहे. यामुळेच शिवसेनाप्रमुखांच्या निर्वाणानंतर शिवसेना टिकलीच नाही तर ती वाढली सुद्धा.

शिवसेनेची सूत्रं हाती घेताच उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा मुद्दा घेतला. २०१३ मध्ये या मुद्द्यावर महाराष्ट्र पिंजून काढत त्यांनी तत्कालीन आघाडी सरकारला नामोहरम केलं. पण यावर ते थांबले नाहीत. सत्ताधाऱ्यांवर टीका करून समस्या सुटत नाहीत हे जाणून त्यांनी दुष्काळग्रस्तांना मदतीचा ओघ सुरु केला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या हजारो मुलामुलींचा विवाह थाटामाटात लावून देण्याचा उपक्रम सुरु केला. शिवाय दुष्काळग्रस्तांना पाणी, चारा, पाण्याच्या टाक्या, अन्नधान्य आणि रोख रक्कम अशा स्वरूपाची मदत शिवसेनेकडून कायमच केली गेली. याशिवाय स्वतःच्या फोटोग्राफी प्रदर्शनातुन जमा झालेले तब्बल ५ कोटी ११ लाख रुपये उद्धव ठाकरेंनी दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून दिले. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे दुष्काळ दौरे आणि मदतवाटपाचा ओघ अगदी आजही चालूच आहे. दुष्काळग्रस्तांना शिवसेनेऐवढी मदत करून त्यांचे अश्रू पुसणारा दुसरा पक्ष महाराष्ट्रातच काय देशातही सापडत नाही.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडली. उद्धव ठाकरे यांनी मात्र युती अभेद्य ठेवली. शिवसेनेला प्रचंड मोठं यश मिळालं. शिवसेनेने लढवलेल्या २० जागांपैकी शिवसेनेला तब्बल १८ जागांवर विजय मिळाला. शिवसेना भाजपनंतरचा एनडीए मधील सर्वात मोठा पक्ष ठरला. लोकसभेला भाजपला बहुमत मिळालं. याचाच फायदा घेण्यासाठी भाजपने शिवसेनेला बेसावध ठेऊन युती तोडण्याचा डाव खेळला. उद्धव ठाकरेही आपल्या १५१ जागांच्या मागणीवर ठाम राहिले. अखेर याचंच निमित्त करून भाजपने युती तोडली. प्रचंड मोदी लाट असतानाही आणि भाजपचे सर्व राज्यांतील व केंद्रातील प्रमुख नेते प्रचाराला उतरूनही उद्धव ठाकरेंनी भाजपला स्वबळावर महाराष्ट्र जिंकू दिला नाही. शिवसेनेचे स्वबळावर ६३ आमदार निवडून आले. आधी राष्ट्रवादीच्या छुप्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपला उद्धव ठाकरे यांच्या यशस्वी डावपेचांमुळे शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घ्यावं लागलं.

सत्तेत सहभागी झाल्यानंतरही उद्धव ठाकरे स्वस्थ बसले नाहीत. देशात आणि राज्यात मोदी आणि भाजपला विरोधकच राहिला नाही हे त्यांनी वेळीच ओळखलं. भाजपसोबत सत्तेत सहभागी असतानाही त्यांनी भाजपच्या चुकांवर जनतेच्या बाजूने आवाज उठवला. यावरून शिवसेनेवर प्रचंड टीका झाली मात्र त्यांनी आपली भूमिका सोडली नाही. जनतेच्या मनातील आवाज ओळखून तो मुद्दा उचलण्यात ते यशस्वी ठरले. २०१७ मध्ये मुंबई-ठाणे जिंकण्यासाठी भाजप पुन्हा २०१४ विधानसभेप्रमाणे ऐनवेळी युती तोडणार हे लक्षात घेऊन उद्धव ठाकरेंनी स्वतः युती तोडली. मुंबई-ठाण्यावर स्वबळावर भगवा फडकावून दाखवला. अगदी शिवसेनेला भाजपपेक्षा केवळ चार जागा जास्त मिळूनही त्यांनी भाजपला महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागेल असे डावपेच खेळले. ते यशस्वीही झाले. मुंबईत महापौर बसवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपला मोठं यश मिळूनही उपमहापौरदेखील बसवता आला नाही. भाजपने इतर अनेक राज्यात विरोधी आणि मित्रपक्ष फोडून सत्ता काबीज केली. पण उद्धव ठाकरेंनी त्यांना महाराष्ट्रात हे साध्य करू दिलं नाही. अगदी बाळासाहेबांच्या हयातीत शिवसेना अनेकदा फुटली पण उद्धव ठाकरेंनी गेल्या ५ वर्षात शिवसेना अभेद्य ठेवली हे त्यांचं यश मानलं जातं.

२०१४ ते २०१९ या केंद्र आणि राज्य सरकारच्या काळात जनतेचा आवाज राष्ट्रीय पक्ष असून काँग्रेसला जे करता आलं नाही, ५० वर्षांचा राजकीय अनुभव असून शरद पवारांनी जे केलं नाही ते उद्धव ठाकरेंनी केलं. नोटबंदीनंतर केवळ दोनच दिवसात पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी या निर्णयातील फोलपणा देशासमोर मांडला. आज देशाची आर्थिक स्थिती पाहता उद्धव ठाकरेंनी त्यावेळी मांडलेले मुद्दे किती योग्य होते हे समजतं. जीएसटीसारख्या निर्णयातही त्यांनी आपली ठाम भूमिका मांडत बदल करवून घेतले. मोदींना जाब विचारणारे देशातील एकमेव नेते म्हणून उद्धव ठाकरे पुढे आले. महाराष्ट्रातही शेतकरी आत्महत्या, दुष्काळ अशा प्रश्नांवर त्यांनी अगदी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. राज्य सरकारने जी कर्जमाफी केली त्याच संपूर्ण श्रेय केवळ उद्धव ठाकरेंना जातं.
आजही सरसकट कर्जमाफीसाठी शिवसेना झटत आहे. नाणार आणि जैतापूर प्रकल्पांना विरोध, पीक विमा प्रश्नावर उठवलेला आवाज यामुळे शिवसेना सत्तेत राहूनही कायम जनतेच्या जवळ राहिली. केवळ शिवसेनेमुळे तब्बल १० लाख शेतकऱ्यांना ९६० कोटी रुपये पीक विमा रक्कम मिळाली. या सर्व गोष्टींपेक्षाही अनपेक्षित आणि ऐतिहासिक अशी एक गोष्ट उद्धव ठाकरेंनी केली. ती म्हणजे राम मंदिर प्रश्नावर थेट अयोध्येत जाऊन मोदींना जाब विचारणं. दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यात शिवसेनेने प्रचंड शक्तिप्रदर्शन केलं. त्यांना रोखण्यासाठी भाजपला मदत म्हणून संघ-विहिंप धावले. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा प्रभाव कमी करण्यासाठी त्याचवेळी विहिंपने ५ लाख कार्यकर्ते अयोध्येत जमवून शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला. पण उद्धव ठाकरेंच्या झंझावातापुढे विहिंपची महासभा फ्लॉप ठरली. यानंतर महाराष्ट्रातील पंढरपुरात नरेंद्र मोदींची ज्या मैदानावर सभा झाली होती तिथेच राम मंदिर प्रश्नावर उद्धव ठाकरेंची सभा झाली. ही सभा मोदींच्या सभेपेक्षा मोठी झाल्याने भाजपला अक्षरशः धडकी भरली. दुसरीकडे मध्यप्रदेश,छत्तीसगड,राजस्थान राज्यांत भाजपचे एका मंत्र्यांसह ५ आमदार शिवसेनेने पाडले. यामुळेच लोकसभेला पुन्हा शिवसेनेला सोबत घेण्याची धडपड भाजपने सुरु केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे काही मुद्दे पटत नसले तरी जनतेला अजूनही काँग्रेस नको आहे हे जाणलं. शिवाय भाजपकडे निदान नेतृत्व तरी आहे, काँग्रेसकडे नेतृत्वाचा पूर्णपणे अभाव आहे हे लक्षात घेतलं. समान विचारसरणी मुद्द्यावर पुन्हा भाजपशी युती केली. त्यांच्या या निर्णयाचा अंदाज कोणालाच लावता आला नाही. उद्धव ठाकरेंचा हा निर्णय सुद्धा कमालीचा यशस्वी ठरला. शिवसेनेचे २३ पैकी १८ खासदार विजयी झाले. भाजपला तब्बल ३०३ जागा मिळाल्या. साहजिकच एवढं मोठं यश मिळाल्यानंतर भाजप विधानसभेत युती ठेवणार नाही अशी चर्चा सुरु झाली. मात्र उद्धव ठाकरे यांनी भाजपला तेवढी मोकळीक दिलीच नाही.

भाजपने इतर पक्षांतील नेते भाजपमध्ये आणण्याचा धडाका लावताच त्यांनी शिवसेनेत सुद्धा इनकमिंग सुरु केलं. यामुळे भाजप स्वबळावर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करू शकणार नाही. शिवाय लोकसभेत युती करतानाच त्यांनी भाजपला “समसमान” मुद्द्यावर युती करण्यास भाग पाडलं. यामुळेच आज ३०० पेक्षा जास्त जागा मिळूनही भाजप नेत्यांमध्ये स्वबळाच्या खुमखुमीऐवजी युतीची भाषा दिसते. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेची पूर्वतयारी म्हणून शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे येत आहे. जनतेच्या मनातही त्यांचं नेतृत्व रुजत आहे. ही बाब शिवसेनेच्या भविष्यकाळासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे.

या सर्व गोष्टींचा अभ्यास केला असता शिवसेनेची उद्धवनीती कमालीची यशस्वी ठरली असं म्हणावं लागेल. उद्धव ठाकरेंच्या याच रणनीतीमुळे शिवसेना आज महाराष्ट्रात टॉपवर आहे. महाराष्ट्रात आगामी काळात विधानसभा निवडून आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे नेमके कोणते डावपेच खेळतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात शिवसेनेला टॉपवर ठेवण्याचा करिष्मा मात्र त्यांनी करून दाखवला आहे एवढं नक्की.

Leave a comment

0.0/5