Skip to content Skip to footer

राज्यात इतरत्र पसरलेल्या कोकणातील जनतेला पुन्हा स्वगृही आणण्यासाठी आमदार.योगेश कदम यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन..

कोरोनाच्या बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलेली आहे. राज्या-राज्यातील तसेच जिल्ह्यामधील सीमा सुद्धा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नोकरी, व्यवसाय, शिक्षण व इतर कामानिमित्त मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्यातील इतर भागात वास्तव्यास असलेल्या कोकणातील जनतेला पुन्हा आपल्या गावी परतण्याची परवानगी मिळावी, असे निवेदनाचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दापोली खेड मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी दिले आहे.

सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन कालावधीत वाढ होत आहे. तसेच कोरोनाचा आकडा सुद्धा वाढत चालला आहे. त्यातच परगावी राहणाऱ्या कोकणवासीयांना दाट वस्तीत राहावे लागत असल्याने तेथील संसर्गामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांना अशा धोकादायक ठिकाणी राहण्यास समस्या निर्माण होत असल्याचे, आमदार कदम यांनी पत्राद्वारे सांगितले आहे. अनेकांना आपल्या गावी येऊन मोकळ्या व सुरक्षित जागेत राहवेसे वाटत आहे, त्यासाठी लोकप्रतिनिधींकडे सारखी मागणी करण्यात येत असल्याचे देखील ते म्हणाले.

तसेच कोकणातील कृषी क्षेत्रासाठी मे ते सप्टेंबर हा काळ अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो. या कालावधीमध्ये परगावी असलेले चाकरमानी व नागरिक स्वगृही परतून शेती करतात. ज्यामुळे कोकणातील शेतीविकास व प्रमुख पिके, अन्नधान्याची उत्पादकता वाढते. परंतु लॉक डाउनच्या या परिस्थितीमध्ये त्यांना स्वगृही परतण्याची मुभा नसल्याने कृषी क्षेत्राची हानी होऊ शकते. त्यामुळेच या लोकांना आपल्या मूळ गावी परतण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आमदार योगेश कदम यांनी केली आहे.

यावर मंत्रालयातर्फे जि.प. गट ते तालुका निहाय परगावी राहणाऱ्या लोकांची यादी व त्यांना स्वगृही परतण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रक्रियेचा अहवाल बनवण्याचे सूचित केले आहे. त्यावरील कामासाठी आमदार कदम यांनी जि.प. गटप्रमुख ते तालुकाप्रमुख या सर्वांना पुढील सूचना केल्याची माहिती दिली आहे.

Leave a comment

0.0/5