Skip to content Skip to footer

विधान परिषद निवडणुका लवकर जाहीर करा, राज्यपालांचं निवडणूक आयोगाला पत्र

महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुका लवकर जाहीर करा या आशयाचं एक पत्र महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिलं आहे. “केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या ९ रिक्त जागांसाठीच्या निवडणुका लवकरात लवकर जाहीर कराव्यात” अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे. करोनाच्या संकटामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याची तारीख काय असेल ते जाहीर करण्यात आलेलं नाही. आता लवकरात लवकर या निवडणुकांची तारीख जाहीर करा असं राज्यपालांनी पत्रात म्हटलं आङे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ही विनंती निवडणूक आयोगाला केली आहे. २४ एप्रिल पासून राज्यातील विधान परिषदेच्या जागा रिक्त आहेत. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका घेण्यात याव्यात असं राज्यपालांनी स्पष्ट केलं आहे.

९ एप्रिलला राज्याच्या मंत्रिमंडळाने उद्धव ठाकरेंची नियुक्ती राज्यपालांच्या कोट्यातून विधानपरिषदेवर करावी असा निर्णय घेतला होता आणि तसा ठराव राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना पाठवण्यात सुद्धा आला होता. मात्र त्याच्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्याच्यामुळे अलीकडेच मंत्रिमंडळाने या या ठरावाचा पुनरुच्चार केला. आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीच केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवून महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणुका शक्य असेल तितक्या लवकर घ्यावी अशी विनंती केली आहे.

काय म्हटलं आहे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी?

करोना संकटाच्या काळात राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये, यासाठी विधानपरिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी मा. राज्यपाल भगत सिंह कोश्यारीजी यांनी निवडणूक आयोगाकडे शिफारस करण्याचा जो निर्णय घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो.
संविधानाच्या तत्वांचे पालन करीतच मा. राज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोग या शिफारसीवर केंद्रीय गृहमंत्रालयाशी सल्लामसलत करून तत्काळ विधानपरिषदेच्या ९ जागांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय करेल, हा आम्हाला विश्वास वाटतो.
शिवाय, यामुळे राज्यपाल नियुक्त सदस्यांनी मंत्री किंवा मुख्यमंत्री होऊ नये, या संकेतांचे सुद्धा पालन होईल. मा. मुख्यमंत्र्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.

Leave a comment

0.0/5