Skip to content Skip to footer

लोकडाऊन इफेक्ट : या कंपनीने केले कर्मचारी कपात

लोकडाऊन इफेक्ट : या कंपनीने केले कर्मचारी कपात

देशात सर्वत्र खाद्यपदार्थ घरपोच पोहचवणारी सेवा देण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या स्विगीने आता कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्गामुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याने ११०० कर्मचाऱ्यांना येत्या काही दिवसांत कामावरून कमी करण्याचा निर्णय स्विगीच्या व्यवस्थापक मंडळने घेतला आहे. याविषयीची घोषणा स्विगीतर्फे सोमवारी करण्यात आली. कोरोनामुळे निर्माण परिस्थितीचा स्विगीच्या मुख्य व्यवसायावर तसेच त्याच्या क्लाऊड किचन व्यवसायावर विपरित परिणाम झाला आहे.

स्विगीचे संस्थापक व सीईओ श्रीहर्ष मजेटी यांनी सांगितले की, आज स्विगीसाठी सर्वात दुःखाचा दिवस आहे. नाईलाजाने कंपनीला आपला आकार कमी करावा लागत आहे, याची माहिती देणारे ईमेल कर्मचाऱ्यांना स्विगीने पाठवले आहेत, असे कंपनीने आपल्या ब्लॉगवर म्हटले आहे. स्विगीने आपल्या किचन सेवा यापूर्वीच बंद करण्यास सुरुवात केली आहे. या सेवा तात्पुरत्या किंवा कायमच्या बंद करण्याचा कंपनीचा विचार आहे. कामावरून कमी करण्यात येणारे ११०० कर्मचारी हे विविध स्तरांतील आहेत, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. नुकतीच झोमॅटोने १३ टक्के कर्मचारीकपात केली होती. त्यानंतर स्विगीने हे पाऊल उचलले आहे.

कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांशी स्विगीचा मनुष्यस्रोत विभाग लवकरच संपर्क साधणार असून, त्यांना चांगला आर्थिक लाभ देतानाच त्यांचे समुपदेशनही केले जाणार आहे. या कर्मचाऱ्यांना स्विगीतर्फे किमान तीन महिन्यांचे वेतन दिले जाणार आहे. याशिवाय त्यांनी जितकी वर्षे या कंपनीत काम केले आहे त्या प्रत्येक वर्षासाठी एक महिन्याचे वेतन दिले जाणार आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5