कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मिळणार 65 लाख
कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण होऊन प्राण गमवावे लागणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांना आता प्रत्येकी ६५ लाख रुपयांची आर्थिक मिळकत मिळणार आहे. राज्य सरकार मृत पोलिसांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये भरपाई आणि घरातील एकाला नोकरी देणार आहे. तर मुंबई पोलीस फाऊंडेशनकडून १० लाख आणि खासगी बँकेकडून विमा संरक्षण म्हणून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्यात येणार आहेत.
मृत पोलिसांच्या कुटुंबीयांना देण्यात येणाऱ्या या भरपाईचा निर्णय पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी घेतल्याची माहिती पोलिसांचे प्रवक्ते आणि पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी दिली आहे. कोरोना व्हायरसमुळे मुंबईत आतापर्यंत ८ पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ६०० पोलिसांना संसर्ग झाला आहे. उद्योजक, व्यावसायिक, सेलिब्रिटी आणि बॉलिवूडमधील लोकांकडून डोनेशन घेण्यासाठी २०१८ मध्ये मुंबई पोलीस फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली होती. या फाऊंडेशनमध्ये जमा झालेला पैसा पोलिसांच्या कल्याणासाठी वापरला जातो. त्यातूनच आता कोरोनाने दगावलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदत देण्यात येणार आहे.