Skip to content Skip to footer

आदित्य ठाकरेंच्या मागणीनुसार केंद्र सरकारने बदलला निर्णय..

रत्नागिरी- नागपूर हायवे क्रमांक १६६ च्या नियोजीत रस्त्यावर हे झाड येत होतं.

भोसे (जि. सांगली) येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या आड येणारा सुमारे ४०० वर्षे पुरातन वटवृक्ष वाचविण्याबाबत राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली होती. या पत्रास मान ठेवून महामार्गाचा नकाशा बदलला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली.

रत्नागिरी- नागपूर हायवे क्रमांक १६६ च्या नियोजीत रस्त्यावर सांगलीजवळील भोसे गावात ४०० वर्ष जुनं वडाचं झाडं येत होतं. स्थानिकांनी रस्त्याला विरोध करत आंदोलन केलं. काही स्थानिकांनी आदित्य ठाकरेंना विनंती केली असता त्यांनी याची नोंद घेत गडकरींना पत्र लिहलं. आता गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

रत्नागिरी-कोल्हापूर-मिरज-सोलापूर (राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६) या नियोजित रस्त्याच्या कामामुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना मोठय़ा प्रमाणावर फायदा होणार आहे. मिरज ते पंढरपूर या शहरांच्या दरम्यान हा महामार्ग मौजे भोसे (ता. मिरज) या गावातून जातो. येथे यल्लमा देवीचे पुरातन मंदीर असून या मंदिरासमोरच सुमारे ४०० वर्षांपूर्वीचा महाकाय वटवृक्ष आहे. त्याचा विस्तार सुमारे ४०० चौ.मी. इतका व्यापक आहे.

हा वटवृक्ष त्या परिसरातील एक ऐतिहासिक ठेवा तर आहेच, त्याचबरोबर ते वटवाघळे आणि इतर दुर्मिळ पक्षी यांच्याकरीता नैसर्गिक निवासस्थान देखील आहे. त्यामुळे संबंधीत जागेवरील महामार्गाचे संरेखन काही प्रमाणात बदलून वटवृक्षाचे जतन होण्याबाबत कार्यवाही करण्याची विनंती आदित्य ठाकरे यांनी गडकरींना केली होती.

Leave a comment

0.0/5