Skip to content Skip to footer

जिद्द… एका रात्रीत नंदूरबार-मुंबई ४०० किमीचा प्रवास करुन NEET च्या परिक्षेसाठी पोहचली

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदवी प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय प्रवेश परीक्षा (नीट) रविवारी देशभरातील ३ हजार ८४२ परीक्षा केंद्रावर घेण्यात आली. या परीक्षेसाठी १५ लाख ९७ हजार ४३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ८५ ते ९० टक्के विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. राज्यातील २ लाख २८ हजार ९१४ नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची ६१५ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. मुंबई आणि परिसरातील बहुतेक केंद्रांवर परीक्षा सुरळीत झाली. पण यासाठी विद्यार्थांना दूरचा प्रवास करावा लागला. काही विद्यार्थांना तर परिक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी ३०० ते ४०० किमीचं अंतर पार करावं लागलं.

नंदुरबार जिल्ह्यातील एका १७ वर्षीय मुलीला नीट परिक्षेला पोहचण्यासाठी एका रात्रीत ४०० किमीचा प्रवास पार करावा लागला. यासाठी तिचे १३ ते १५ हजार रुपये खर्च झाले. नंदूरबारहून ४०० किमीचा प्रवास करुन १७ वर्षीय एंजल गवित मुंबईत पोहचली. त्यानंतर रिक्षा आणि बसने प्रवास करत परिक्षा केंद्र गाठले.

एंजल गवित परिक्षेसाठी बहिण आणि मैत्रिणीसोबत शनिवारी रात्री ९ वजाता नंदूरबारमधील नवापूर येथील घरातून निघाली होती. करोनाच्या पार्श्वभूमिवर त्यांनी खासगी वाहन भाड्यानं केलं होतं. यासाठी त्यांना त्या कारला १३ हजार रुपये भाडं द्यावं लागलं. सात तासांचा प्रवास करुन रविवारी पहाटे चार वाजता ठाण्यातील एका नातेवाईकाकडे पोहचली. थोडावेळ आराम केल्यानंतर एंजल ठाण्याहून बोरिवलीला एका बसने पोहचले. यासाठी तिला दोन तास लागले. त्यानंतर बोरिवलीहून कांदिवलीसाठी ऑटो रिक्षाकरुन परिक्षा केंद्रावर पोहचली.

कांदिवलीतील ठाकूर कॉलेजवर नीट परिक्षा देण्यासाठी मुंबईबाहेरील विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. नाशिक, डहाणूसारख्या शहरातून विद्यार्थी येथे पोहचले होते. मुंबईतील सर्वात मोठ्या नीट परिक्षा केंद्रापैकी ठाकूर कॉलेज एक आहे. येथे जवळपास १२०० विद्यार्थी परिक्षेसाठी उपस्थित होते. विद्यार्थांसोबत आई-वडिलही आल्यामुळे परिक्षाकेंद्रावर गर्दी झाली होती. यांच्यासाठी कॉलेजने आपली मैदानं उघडली होती.

करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक परीक्षा केंद्रावर काळजी घेण्यात येत होती. अंतरनियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला. त्याआधी विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. एखाद्या विद्यार्थ्यांला अगदी काही मिनिटे उशीर झाल्यास त्यांना केंद्रावरील कर्मचारी सहकार्य करत होते. एका वर्गात परिक्षेसाठी फक्त १२ विद्यार्थ्यांना बसवण्यात आलं होतं.

Leave a comment

0.0/5