Skip to content Skip to footer

महामार्गाचा पर्यावरण पूरक विकास करण्यावर भर द्यावा – मंत्री आदित्य ठाकरे

महामार्गाचा पर्यावरण पूरक विकास करण्यावर भर द्यावा – मंत्री आदित्य ठाकरे

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गासह (नागपूर-मुंबई) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडील विविध महामार्गांवर वृक्षारोपण करणे, महामार्गांवर सौर ऊर्जेचा वापर करणे, रेन वॉटर हार्वेस्टींग करणे, इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरास चालना देणे यासह समृद्धी महामार्गाच्या बांधकामामध्ये औष्णिक ऊर्जा निर्मिती केंद्रांमधील फ्लाय ॲशचा वापर करणे या अनुषंगाने सोमवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. महामार्गांचा पर्यावरणपूरक विकास करण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना यावेळी मंत्री पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, भविष्यात पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरास चालना देणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने शासनामार्फत या वाहनांसाठी आतापर्यंत विविध सवलती देण्यात आल्या आहेत. याच पद्धतीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या महामार्गांवर इलेक्ट्रीक वाहनांना टोलमध्ये काही सवलत देता येऊ शकेल का याबाबत विचार करावा, असे त्यांनी सांगितले.

औष्णिक वीज प्रकल्पातून उत्सर्जित होणाऱ्या राखेचा वापर रस्ते बांधकामात केल्यास मोठ्या प्रमाणात प्रदूषण नियंत्रण करता येईल. तसेच महामार्गाचे बांधकाम करतानाच त्यावर सौर ऊर्जेचा वापर, रेन वॉटर हार्वेस्टींग तसेच महामार्गाच्या दुतर्फा आणि विभाजक आदी ठिकाणी वृक्षारोपण करणे आदी कामांवर भर देण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आदी ठिकाणी प्राधान्याने ही कामे करता येतील, असेही त्यांनी बोलून दाखविले.

Leave a comment

0.0/5