Skip to content Skip to footer

आत्महत्येआधी डॉक्टर शीतल आमटेंची सूचक पोस्ट

सोशल मीडियावर पोस्ट केली होती शेअर

महारोगी सेवा समितीच्या सीईओ, ज्येष्ठ समाजसेवक स्व. बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांच्या कन्या डॉक्टर शीतल आमटे–करजगी यांनी आत्महत्या केली आहे. शीतल आमटे यांनी विषाचे इंजेक्शन घेतल्याची माहिती समोर येत असून, हे विष घेतल्यावर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं होतं, पण तिथे उपस्थित वैद्यकीय अधिकार्‍यांनी डॉ. शितल ह्यांचा मृत्यु झाल्याचं घोषित केलं. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरलं आहे. दरम्यान आत्महत्येच्या आधी त्यांनी सोशल मीडियावर एक सूचक पोस्ट शेअर केली होती.

शीतल आमटे यांनी त्यांच्या ट्विटर आणि फेसबुकला एक पेंटिंग शेअर केली आहे. ही पेंटिंग त्यांनी स्वत: काढलं होतं. या पेंटिंगवर त्यांचं नाव आणि २९ नोव्हेंबर २०२० अशी तारीखदेखील आहे. महत्वाचं म्हणजे ही पोस्ट शेअर करताना त्यांनी War and Peace म्हणजेच युद्ध आणि शांतता अशी सूचक कॅप्शन दिली आहे.

 

शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला होता. शीतल आमटे या सर्व वादाच्या केंद्रस्थानी होत्या, असा आरोप वेळोवेळी झाला. हा अंतर्गत गृहकलह सुरू असतानाच आज त्यांच्या आत्महत्येचे वृत्त आलं.

शीतल आमटे यांनी याआधीही काही पोस्ट शेअर केल्या होत्या.

 

 

 

दरम्यान शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर एक चित्रफीत जारी केली होती. त्यात आनंदवनातील कार्यकर्ते तसेच आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप करण्यात आले होते. ही चित्रफीत नंतर दोन तासांतच माध्यमातून हटवण्यात आली होती. त्यात करण्यात आलेल्या आरोपांशी अजिबात सहमत नसल्याचे व ते तथ्यहीन असल्याचे निवेदन आमटे कुटुंबातर्फे जारी करण्यात आले होते. डॉ. विकास, डॉ. प्रकाश, डॉ. भारती व डॉ. मंदाकिनी आमटे यांची स्वाक्षरी असलेल्या या निवेदनात डॉ. शीतल (पूर्वाश्रमीच्या डॉ. शीतल विकास आमटे) या सध्या मानसिक ताण व नैराश्याचा सामना करीत असल्याची स्पष्ट कबुली देण्यात आली होती. शीतल यांनी समाजमाध्यमावर जारी केलेल्या चित्रफितीतसुद्धा तशी कबुली दिल्याचे या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं होतं.
शीतल आमटे यांनी संस्थेच्या कार्यात मोठे योगदान दिले असले तरी त्यांनी विश्वस्त तसेच कार्यकर्त्यांबद्दल जी अनुचित वक्तव्ये केली, ती आधारहीन आहेत. त्यांचे सर्व भाष्य तथ्यहीन आहे. त्यांच्या या आरोपामुळे कुणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून हे निवेदन देण्यात येत असल्याचं या चौघांनी म्हटलं होतं. लोकाश्रयावर विकसित झालेल्या या संस्थेचे काम यापुढेही आमटे कुटुंबातर्फे एकदिलाने चालवले जाईल. तसेच संस्थेने घेतलेल्या नैतिक भूमिकांशी व ध्येयाशी आम्ही प्रामाणिक राहू, असा विश्वास यातून व्यक्त करण्यात आला होता. समाजाने कोणत्याही अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, अशी विनंती यातून करण्यात आली होती. या निवेदनामुळे आमटे कुटुंबातील मतभेद पुन्हा चव्हाटय़ावर आले होते.
 

Leave a comment

0.0/5