Skip to content Skip to footer

बलात्कार पीडितेवर गावाने टाकला बहिष्कार, डॉ नीलम गोऱ्हे संतापल्या

बलात्कार पीडितेवर गावाने टाकला बहिष्कार, डॉ नीलम गोऱ्हे संतापल्या

बलात्कार पीडितेच्या वर्तुणुकीमुळे गावाचे नाव खराब होते असा बनाव करत बलात्कार पीडितेवर बहिष्कार टाकल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात ही घटना घडली असून, या धक्कादायक प्रकारावर विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी संताप व्यक्त ग्रामपंचायतीवर तात्काळ प्रशासक नेमण्याची मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील एका महिलेवर १ जानेवारी २०१५ रोजी चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने ऑक्टोबर २०२०मध्ये चौघांना कोर्टाकडून जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

या प्रकरणात घडलेली धक्कादायक बाब म्हणजे महिलेच्या अल्पवयीन मुलीवरही लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पाचेगाव, वसंतनगर तांडा, जयराम नाईक तांडा (ता. गेवराई) या तीन गावांनी बलात्कार पीडित महिलेला गावातून बहिष्कृत केले. ही घटना समोर आल्यानंतर विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी संताप व्यक्त केला आहे.

निलम गोऱ्हे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून तिन्ही गावांवर तात्काळ प्रशासक नेमण्याची मागणी केली आहे. “पीडितेच्या वर्तनामुळे गावाचे नाव खराब होत आहे आणि खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी तिच्याकडून दिली जाते. त्यामुळे तिला परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आल्याचा गावकऱ्यांनी ठराव केला आहे. तिन्ही गावांच्या सरपंच या महिला आहेत. महिलेला गावात प्रवेश करण्यास बंदी घातल्याचा ठराव या गावांनी १५ ऑगस्ट रोजी केल्याची माहिती समोर आली आहे,” असे निलम गोऱ्हे यांनी पत्रात म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5