Skip to content Skip to footer

अजूनही आशा कायम! Tesla चा नियोजित प्लांट महाराष्ट्रातच येणार? रोहित पवारांनी दिले संकेत

एलन मस्क यांची इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी टेस्लाची अखेर भारतात एंट्री झाली असून कंपनीने भारतातील आपल्या व्यवसायाची सुरूवात करण्यासाठी आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूची निवड केली. बंगळुरूमध्ये कंपनी रिसर्च अँड डेव्हलेपमेंट सेंटर उघडणार आहे. महाराष्ट्राला डावलून टेस्लाने बंगळुरूची निवड केल्याने राजकारणालाही सुरूवात झाली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदिप देशपांडे यांनी टेस्लाने महाराष्ट्राऐवजी बंगळुरूची निवड केल्याने राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला होता. आदित्य ठाकरे यांनी टेस्ला कंपनीला महाराष्ट्रात येण्याचं निमंत्रण दिलं होतं, त्यावरुन देशपांडे यांनी “टेस्ला कंपनी कर्नाटकला पळाली, बोलाची कढी बोलाचा भात, पेज-३ नेत्यांना झटका” असं ट्विट करत आदित्य यांना लक्ष्य केलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी एक आशा पल्लवीत करणारं विधान केलं आहे.

“टेस्लाने रिसर्च अँड डेव्हलेपमेंट सेंटरसाठी कर्नाटकला पसंती दिली असली तरी ते त्यांचा नियोजित प्लांट महाराष्ट्रात उभारण्याबाबत सकारात्मक आहेत”, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली आहे. यासोबतच राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि रायगडच्या पालक मंत्री अदिती तटकरे टेस्लासह ई-वाहन कंपन्यांना महाराष्ट्रात आणण्यास प्रयत्नशील असून सरकारने नेमलेली एक समिती या कंपन्यांच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी सांगितलं. ट्विटरद्वारे रोहित पवारांनी ही माहिती दिली आहे. रोहित पवारांनी केलेल्या या विधानामुळे टेस्ला महाराष्ट्रात येण्याच्या आशा अजूनही कायम आहेत.

Leave a comment

0.0/5