Skip to content Skip to footer

रेल्वे अपघातांतील ३७८ मृतदेह बेवारस

करोनाकाळात रेल्वे अपघातांचा आलेख खाली आला आहे. असे असले तरी मागील सहा वर्षांत झालेल्या अपघातांची अजूनही उकल करण्यात पोलिसांना यश आले नाही. मागील सहा वर्षांत ३७८ मृतदेह अजूनही बेवारस आहेत. यांची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान रेल्वे पोलिसांसमोर आहे.

करोना काळ असल्याने रेल्वेसेवा मर्यादित आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. पण मागील सहा वर्षांपासून अपघातांतील मृतांची अद्याप ओळख पटवण्यात वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याला यश आले नसल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे. मागील सहा वर्षांत रेल्वे अपघातांत मृत पावलेल्या तब्बल ३७८ मृतांची अद्याप ओळख पटलेली नसल्याने वसई रोड रेल्वे पोलिसांसमोर मृतांची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वैतरणा ते मिरा रोडदरम्यान एकूण आठ रेल्वे स्थानके येतात. या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील विरार, नालासोपारा, भाईंदर, मीरा रोड ही सर्वाधिक गर्दीची स्थानके आहेत. शहराच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच प्रवाशांची संख्याही वाढली आहे. वाढत्या गर्दीमुळे प्रवास अधिक धोकादायक बनत चालला आहे. यामुळे विविध प्रकारच्या अपघातांच्या घटना घडत आहेत. रूळ ओलांडणे, लोकलमधील गर्दीमुळे खाली पडणे, ओव्हरहेड तारेचा धक्का बसणे यामुळे प्रवाशांचे मृत्यू वाढले आहेत.

रेल्वे अपघातांत मरण पावलेल्या बेवारस मृतांची आकडेवारी मोठी असून मोठय़ा प्रमाणात मृतांच्या वारसांचा शोध घेण्याचे आव्हान वसई रोड रेल्वे पोलिसांना करावे लागणार आहे. अपघातात मृत्यू झालेल्या मृतदेहांचे चेहरे किंवा इतर अवयवांवरून ओळख पटवणे व मृतांच्या वारसाचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. रेल्वे अपघातांत मृत्यू पावलेल्यांचे मृतदेह एक महिना शवागारात ठेवले जातात. संशयास्पद मृत्यू असल्यास शवविच्छदेनानंतरदेखील तो मृतदेह बराच काळ तसाच ठेवला जातो. त्यानंतर नियमानुसार त्या मृतदेहांवर अंतिम संस्कार केले जातात, अशी माहिती वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याकडून देण्यात आली.

वर्ष           ओळख न

पटलेल्यांची आकडेवारी

२०१५              ७४

२०१६            ८०

२०१७           ७५

२०१८            ७०

२०१९            ४७

२०२०             ३२

Leave a comment

0.0/5