राज्यानं केंद्राला दिलं ‘उत्तर’, राजीव गांधींच्या नावाने आता IT पुरस्कार देईल राज्य सरकार

महाराष्ट्र बुलेटिन : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार खेलरत्न मधून वगळण्यात आल्याच्या काही दिवसांनीच राज्य सरकारने नवीन पुरस्कार जाहीर केला आहे. असे म्हटले जात आहे की, महाराष्ट्र सरकारने हा पुरस्कार केंद्राला उत्तर म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने मंगळवारी समाजाला मदत करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) संस्थांचा सन्मान करण्यासाठी राजीव गांधींच्या नावाने एका पुरस्काराची स्थापना केली. काँग्रेस हा राज्य सरकारमधील एक घटक पक्ष आहे. एका सरकारी आदेशात म्हटले आहे की हा पुरस्कार १९८४ ते १९८९ पर्यंत देशाचे पंतप्रधान राहिलेले राजीव गांधी यांच्या भारतात आयटी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठीच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आहे.

एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले गेले आहे की, हा पुरस्कार दरवर्षी २० ऑगस्ट रोजी काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी प्रदान केला जाईल, परंतु या वर्षी प्राप्तकर्त्याची निवड ३० ऑक्टोबरपर्यंत केली जाईल. पुरस्कारासाठी संस्थांच्या निवडीची रूपरेषा ठरविण्यासाठी महाराष्ट्र माहिती आणि तंत्रज्ञान महामंडळ नोडल एजन्सी असेल.

राजीव गांधी यांचा जन्म २० ऑगस्ट १९४४ रोजी मुंबईत झाला होता. राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादीसह काँग्रेसचा सहभाग आहे. उल्लेखनीय म्हणजे, भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात हॉकीचे दिग्गज ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असे केले.

शिवसेनेने उपस्थित केले होते प्रश्न

याआधी शिवसेनेने म्हटले होते की, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव हॉकीचे दिग्गज ध्यानचंद यांच्या नावावर ठेवण्याचा निर्णय लोकांची इच्छा नसून हा ‘राजकीय खेळ’ आहे. पक्षाने आपल्या मुखपत्र ‘सामना’ मध्ये प्रकाशित केलेल्या संपादकीयमध्ये देखील प्रश्न उपस्थित केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे क्रिकेटमध्ये योगदान काय आहे, जे त्यांनी अहमदाबादमधील स्टेडियमचे नाव त्यांच्या नावावर ठेवले आहे.

शिवसेनेने म्हटले की माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हे दहशतवादी हल्ल्यांचे बळी ठरले होते. नेत्यांमध्ये राजकीय मतभेद असू शकतात, परंतु देशाच्या विकासासाठी त्यांच्या बलिदानाची अशी थट्टा करणे योग्य नाही. संपादकीयात म्हटले आहे की, “राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे मेजर ध्यानचंद खेलरत्न असे नामकरण करणे ही लोकांची इच्छा नसून एक राजकीय खेळ आहे. राजीव गांधींच्या बलिदानाचा अपमान न करता ही मेजर ध्यानचंद यांचा आदर करता आला असता, पण देशात अशा परंपरा आणि संस्कृती समाप्त झाल्या आहेत. यामुळे मेजर ध्यानचंदही स्वर्गात दुःखी झाले असतील.”

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here