महाराष्ट्र बुलेटिन : बुधवारी लोकसभेप्रमाणेच राज्यसभेतही भाजपा सरकारच्या हिटलरशाहीचा प्रत्यय अख्ख्या जगाला आला. भाजपा सरकारने देशामधील विमा कंपन्या विकायला काढल्या असून त्यासंदर्भातील विधेयक तीव्र विरोधानंतरही भाजपा सरकारने मंजूर करून घेतले आहे. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी सभागृहामध्ये विरोधी बाकांमधील जागेत शेकडो मार्शल्स घुसवले गेले. या सर्व प्रकाराचा निषेध करत विरोधी पक्षांनी बुधवारचा दिवस हा हिंदुस्थानच्या लोकशाहीतील काळा दिवस असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या.
भाजपा सरकारने देशातील सर्वसामान्य जनतेचा पैसा असलेल्या बँका आणि विमा कंपन्या विकण्याचा आणि खासगीकरणाचा सपाटा लावला आहे. हद्द म्हणजे युनायटेड इंडिया इन्शुरन्स ही कंपनी फायद्यात असूनही केंद्र सरकारला ती विकायची आहे. या अनुषंगानेच सरकारने जनरल इन्शुरन्स बिझनेस (नॅशनलायझेशन) दुरुस्ती विधेयक बुधवारी राज्यसभेत मांडले.
शासनाच्या मालकीच्या असणाऱ्या कंपन्या विकण्यास विरोधकांचा तीव्र विरोध होता. त्यामुळे सभागृहात विरोधकांडून या विधेयकाला प्रचंड विरोध झाला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत, अनिल देसाई, प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह विरोधी पक्षांच्या खासदारांनी घोषणा देत सभापतींच्या आसनासमोरच्या जागेत धाव घेतली. दरम्यान सभागृहात एकच गोंधळ उडाला. जोरदार घोषणाबाजीमुळे जवळपास दोन वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. कामकाज पुन्हा सुरु केल्यानंतर विरोधकांनी या विधेयकाच्या विरोधात घोषणाबाजी करणे सुरूच ठेवले. त्यावर सरकारने सभागृहाबाहेरील शेकडो मार्शल्सना बोलवून विरोधी खासदारांसमोर कडे केले, त्यामध्ये महिला मार्शल्सही होत्या.
हा दिवस म्हणजे हिंदुस्थानच्या लोकशाहीतील काळा दिवस
विरोधी पक्षाच्या खासदारांनी भाजपाच्या या प्रवृत्तीचा तीव्र विरोध केला. अशी बेबंदशाही आपल्या कारकिर्दीत कधीच पाहिली नव्हती असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांनी काढले, तर खासदार खरगे आणि चिदंबरम म्हणाले की, शरमेने मान खाली घालावी असे सर्व चित्र सभागृहात होते. बुधवारचा दिवस हा हिंदुस्थानच्या लोकशाहीतील काळा दिवस आहे अशा प्रतिक्रिया तर सगळ्यांच्याच होत्या.