Skip to content Skip to footer

वाळू उत्खननाबाबत लवकरच नवे व्यापक धोरण आणणारः महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

वाळूच्या बेकायदेशीर उत्खननास व वाळू माफियांच्या दहशतीला आळा घालण्यासाठी लवकरच सर्वंकष धोरण आणण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत लक्षवेधीदरम्यान सांगितले.

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तहसीलदार यांनी पिंपळखुटा रोडवरील 13 व 14 व्या शतकातील पुरातन सोमतीर्थ, बारव पुरातन थडगे असलेली जमीन, लोणार तहसील कार्यक्षेत्रात वाळूची अवैध वाहतूक, तालुक्यात सुरू असलेले अवैध गौण खनिज उत्खनन याबाबत सदस्य संजय गायकवाड यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना मंत्री विखे पाटील बोलत होते.

वाळू माफियांना पायबंद घालून, नदीपात्रासह अन्य ठिकाणाच्या बेकायदेशीर वाळू उपशाला पूर्णतः आळा घालण्यासाठी येत्या 15 जानेवारीपर्यंत वाळू उत्खननासंदर्भातील नवीन धोरण जाहीर करणार, तसेच सर्वसामान्यांना यापुढे सरकारी डेपोमधून थेट वाळू मिळावी यासाठी प्रयत्न सुरू.

वाळू माफियांवर कारवाईच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
मंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की, या धोरणामुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना चाप बसेल. सामान्य नागरिकांना सरकारी डेपोतून रेती उपलब्ध होईल. याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लोणारमधील वाळूच्या अवैध वाहतुकीबाबत अमरावतीच्या विभागीय आयुक्त यांच्यामार्फत चौकशी केली जाईल.

लोणारच्या तहसीलदारांची चौकशी
बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना लोणारच्या तहसीलदारांबाबत गंभीर स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींच्या चौकशीनंतर प्राप्त निष्कर्षाच्या आधारे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5