…तर देशातील जनता रस्त्यावर उतरेल, माजी गव्हर्नर रघुनाथ राजन यांचा मोदी सरकारला इशारा
खोट्या बातम्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील तरुणांचे लक्ष अधिक काळ विचलित करता येणार नाही किंवा त्यांना फारकाळ गुंतवूणही ठेवता येणार नाही. देशात वेळीच रोजगार निर्मिती झाली नाही तर देशातील तरुण रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल, असा इशारा आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केंद्रातील मोदी सरकारला दिला आहे. रिसर्च सेंटर फॉर फायनान्शियल स्टडीजच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये राजन यांनी हा इशारा दिला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, देशातील तरुणांना रोजगार हवा आहे. रोजगारासारख्या मूळ मुद्यावरुन त्यांचे लक्ष विचलित करण्यासाठी खोट्या बातम्या आणि सोशल नेटवर्किंगचा वापर मर्यादित काळापर्यंत करता येईल. परंतु ते फारकाळ प्रभावी ठरणार नाही. देशात वेळीच रोजगार निर्मिती झाली नाही तर हे तरुण रस्त्यावर उतरुन आंदोलने करतील, असे राजन म्हणाले.
जीडीपीच्या ५० टक्के क्रेडिट अशी आपली भयंकर परिस्थिती आहे. आपण क्वालिटी आणि क्वांटीटी अशा दोन्ही बाबतीत मार खात आहोत. त्यामुळे देशाची आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी काम करणे गरजेचे आहे. असेम्बली मार्केटचा विस्तार हे चीनच्या निर्यातीत वाढ होण्याचे आणि प्रगतीचे मुख्य कारण आहे. तसे वातावरण आपल्या इथे निर्माण करण्याची गरज आहे, असेही राजन म्हणाले.