भारतीय नौदलाचं MiG-29K विमान अरबी समुद्रात कोसळलं

भारतीय-नौदलाचं-mig-29k-विमान-अरब-Indian-Navy-mig-29k-aircraft-Arab
ads

एका वैमानिकाला वाचवण्यात यश

भारतीय नौदलाचं प्रशिक्षक मिग-२९के विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. नौदलाचं मिग-२९के विमान गुरुवारी अरबी समुद्रात कोसळलं आहे. अरबी समुद्रावरुन उड्डाण करत असताना विमान दुर्घटनाग्रस्त झालं. दुर्घटनेची माहिती मिळताच सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं. रेस्क्यू टीमने एका वैमानिकाला वाचवलं असून दुसऱ्या वैमानिकाचा शोध अद्याप सुरु आहे. याप्रकरणी सध्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

भारतीय नौदलाकडून यासंबंधी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. “भारतीय नौदलाचं मिग-२९के प्रशिक्षक विमान २६ नोव्हेंबरला पाच वाजता दुर्घटनाग्रस्त झालं. एका वैमानिकाचा शोध लागला आहे, तर दुसऱ्या वैमानिकाचा हवाई तसंच समुद्रमार्गे शोध घेतला जात आहे. याप्रकरणी चौकशीचा आदेश देण्यात आला आहे,” अशी माहिती भारतीय नौदलाने दिली आहे.
मिग-२९ विमानं याआधीही अनेकदा दुर्घटनाग्रस्त झाली आहेत. ८ मे २०२० रोजी पंजाबमधील नवाशहर येथे नौदलाचं लढाऊ विमान मिग-२९ तांत्रिक बिघाड झाल्याने दुर्घटनाग्रस्त झालं होतं. यावेळी वैमानिकाने पॅराशूटच्या सहाय्याने विमानातून उडी मारुन आपला जीव वाचवला होता. विमान एका शेतात दुर्घटनाग्रस्त झालं होतं, ज्यामुळे शेताला आग लागली होती.
तर २३ फेब्रुवारी २०२० रोजी गोव्यात मिग-२९ दुर्घटनाग्रस्त झालं होतं. वैमानिक या दुर्घटनेतून सुखरुपपणे बाहेर पडला होता. सकाळी १० वाजता विमानाने प्रशिक्षणासाठी उड्डाण केलं होतं. मात्र काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाड झाला ज्याची माहिती एअर ट्राफिक कंट्रोलला देण्यात आली. याचदरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त झालं.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here