Skip to content Skip to footer

धोनीलाही बसला बर्ड फ्लूचा फटका; कडकनाथ कोंबड्यांसंदर्भातील मोठी बातमी

देशभरामध्ये दिवसोंदिवस बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे मध्य प्रदेशमध्ये बर्ड फ्लूची नवीन प्रकरणे समोर येत आहेत. बर्ड फ्लूचा वेगाने प्रसार होत असून याचा फटका आता भारतीय संघाचा माजी कर्णधार असणाऱ्या महेंद्र सिंह धोनीलाही बसणार आहे. धोनीने मागवलेल्या कडकनाथ प्रजातीच्या कोंबड्यांनाही ठार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रक्रियाही सुरु झाल्याचे समोर येत आहे. धोनीने मागवलेल्या अडीच हजार कडकनाथ कोंबड्यांच्या पिल्लांना बुधवारी झाबुआमध्ये ठार करण्यात येणार आहे. या कोंबड्यांच्या पिल्लांबरोबर ठेवण्यात आलेल्या काही पिल्लांमध्ये बर्ड फ्लूचा विषाणू आढळल्याने ही करावाई करण्यात येणार आहे. येथील पोल्ट्रीमधील काही कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे नमूने भोपाळमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यामध्ये बर्ड फ्लूमुळेच हे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

झाबुआमधील कडकनाथ कोंबड्या या आता सर्वच ठिकाणी प्रसिद्ध झाल्यात. अधिक पौष्टीक आणि आरोग्यदायी मांसांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या कोंबड्यांचा व्यवसाय करणाऱ्यांवरही बर्ड फ्लूमुळे नवे संकट ओढावले आहे. कडकनाथ कोंबड्या मारल्या जाणार असल्याच्या वृत्ताला झाबुआमधील कडकनाथ कोंबड्यांच्या पोल्ट्री मालकांनी दुजोरा दिला आहे. थांदलामधील रुंडीपाडा गावातील कडकनाथ कुकुटपालन क्षेत्रामधील अनेक कोंबड्या मागील काही दिवसांमध्ये मरण पावल्यानंतर बर्ड फ्लूची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर चाचणीसाठी या कोंबड्यांचे नमुने पाटवण्यात आले असता त्यामध्ये एच फाइव्ह एन वन विषाणू आढळून आला.

झाबुआ हे देशभरामध्ये कडकनाथ कोंबड्यांसाठी ओळखलं जातं. झाबुआमधील पोल्ट्री फार्ममधून धोनीने कडकनाथ कोंबड्या मागवल्या होत्या. मात्र या कोंबड्यांचा पुरवठा अद्याप करण्यात आलेला नसल्याचं इंडिया टुडेने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. आता बर्ड फ्लूमुळे करण्यात येणाऱ्या या कारवाईमुळे आता धोनीने केलेल्या मागणीनुसार कोंबड्यांचा पुरवठा करता येणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. धोनीने आताच सेंद्रीय शेती आणि कुकुटपालनासारख्या व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केलीय.

समोर आलेल्या माहितीनुसार भोपाळमधील पशुपालन विभागाच्या संचालकांनी झाबुआ मधील स्थानिक प्रशासनाला पत्र लिहून यासंदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. बर्ड फ्लूमुळेच कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पशुपालन विभागाची एक टीम मंगळवारी रात्री रुंडीपाडा गावात पाठवण्यात आली आहे. कुकुटपालनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या या गावाबरोबरच गावाच्या एक किलोमीटर परिघातील पक्षांना ठार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच बर्ड फ्लूमुळे मेलेल्या कोंबड्यांना जमिनीमध्ये गाडून त्यांची विल्हेवाट लावली जात आहे. बुधवारपासून जिवंत कोंबड्यांनाही मोठ्या खड्ड्यांमध्ये गाडले जाणार आहे. तसेच या कोंबड्यांची अंडीही नष्ट केली जाणार आहे. रुंडीपाडामधील पोल्ट्रींबरोबरच या गावाच्या आजूबाजूला असणाऱ्या आठ घरांमध्ये खासगी पद्धतीने पाळलेल्या २४ पक्षांनाही ठार करण्यात येणार असल्याचे समजते.

Leave a comment

0.0/5