Skip to content Skip to footer

भाजपसाठी मी तर आयटम गर्ल आहे – आझम खान

लखनऊ – समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्याविरोधात पोलिसांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात २ वर्षांपूर्वी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी दुसऱ्यांदा गुन्हा दाखल केला असून यादरम्यान खान यांनी आपण भाजपची आयटम गर्ल आहोत. आपला वापर निवडणुकांसाठी केला जात असल्याचे म्हटले आहे.

खान यांच्याविरोधात हजरतगंज पोलीस ठाण्यात आंबेडकर महासभेचे सचिव अमरनाथ प्रजापती यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. आझम खान यांनी २०१६साली गाझियाबाद येथील हज हाऊसच्या उद्घाटनप्रसंगी बाबासाहेबांना दुसऱ्यांच्या जमिनी हडपणारा व्यक्ती असे म्हटले होते.

अशा एका माणसाचे पुतळे संपूर्ण राज्यात उभे आहेत, जो आपल्या एका बोटाने हे दाखवू पाहत आहे की, मी उभा आहे ती जमीन तर माझीच आहे. पण ज्याकडे मी बोट दाखवतो आहे ती जमीनसुध्दा माझीच आहे, असे वादग्रस्त वक्तव्य खान यांनी केले होते. राज्यसभा खासदार अमर सिंह यांनी यापूर्वी आपल्या मुलीला अॅसिड अटॅकची धमकी दिल्याप्रकरणी आझम खान यांच्याविरोधात १७ ऑक्टोबर रोजी गोमती नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

खान यांनी आपल्यावरील एफआयआर प्रकरणी उत्तर देताना भाजप माझ्याविरोधात राजकारण करत आहे, असा आरोप केला आहे. मी भाजपची आयटम गर्ल आहे. भाजप माझ्या नावावर सर्व निवडणुका लढवत असते. भाजप गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये आणि आगामी लोकसभा निवडणुकांमध्येही माझ्याच नावाचा वापर करुन निवडणुका जिंकणार असल्याचेही खान यांनी सांगितले.

Leave a comment

0.0/5