Skip to content Skip to footer

लोकसभा निवडणूक 2019: मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे आज शिवसेनेत जाणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या निमित्त येत्या निवडणुकीत पुन्हा आक्रमकपणे सरकारविरोधात भूमिका कशी घेऊ, हे स्पष्ट केलं. पण दोनच दिवसांनंतर सोमवारी मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, त्यामुळे मनसेला हा मोठा धक्का मानला जातोय.

आज दादरमध्ये शिवसेना भवनामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करतील.

गेले अनेक दिवस शरद सोनवणे मनसेला रामराम करून पक्ष बदलतील, अशी चर्चा होती. 2014च्या विधानसभा निवडणुकीत शरद सोनवणे जुन्नरमधून निवडून आले होते.

मनसेचे ते एकमेव विजयी उमेदवार होते. सोनवणे यांना आधी शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र अवघ्या दोन तासांत त्यांचे नाव मागे घेऊन शिवसेना जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशा बुचके यांना विधानसभेसाठी तिकीट देण्यात आलं. त्यानंतर सोनवणे यांनी मनसेकडून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले होते.

आता पाच वर्षांनी पुन्हा एकदा सोनवणे, हे शिवसेनेत जात आहेत. सोनवणे पुन्हा शिवसेनेत येणार, अशा बातम्या आल्यवर शिवसेनेतही चलबिचल सुरू झाली होती.

त्यांच्या नावाला शिवसेनेतूनच तीव्र विरोध सुरू झाला. शिवसेनेच्या आशा बुचके पुन्हा जुन्नरमधून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक आहेत. गेल्या निवडणुकीत सोनवणे यांनी आशा बुचकेंना पराभूत केलं होतं.

शिवसेनेच्या नेत्या आशा बुचके बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या होत्या, “शरद सोनवणे यांच्यासाठी आम्ही तालुक्यात ‘नो एन्ट्री’चा बोर्ड लावला आहे. जुन्नरमधून मीच उमेदवार असेन. मला सर्वांचा पाठिंबा आहे. मला ही शेवटची संधी द्यायचं ठरलं आहे.”

त्यामुळे आता शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर बुचके यांचा दावा खरा ठरेल की शरद सोनवणे यांना दुसरी जबाबदारी देण्यात येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.

मनसे सोडणाऱ्या नेत्यांची मोठी यादी

दीड वर्षापूर्वी मनसेच्या मुंबईतल्या सहा नगरसेवकांनी ‘मातोश्री’वर शिवसेनेत प्रवेश केला होता. सध्या भाजपचे आमदार असलेले राम कदम हेही एकेकाळी मनसेत होते. मनसेच्या नेतृत्वाचा दृष्टिकोन संकुचित होता. त्यामुळे आपण मनसे सोडल्याचं राम कदम यांनी स्पष्ट केलं होतं.

शिवसेनेचे नाशिकमधील खासदार हेमंत गोडसे यांनीही निराश होऊन मनसे आणि राज ठाकरेंची साथ सोडली होती. शिवसेनेचे कन्नडमधील आमदार हर्षवर्धन जाधव, शिवसेना वाहतूक शाखेचे प्रमुख असलेले हाजी अराफत शेख, नाशिकमधले भाजपचे नेते वसंत गीते, औरंगाबाद भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे यांनीही मनसेला सोडचिठ्ठी दिली होती. या नेत्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली होती.

जुन्नरमधील राजकीय समीकरणं

अर्थात जुन्नर तालुक्यात शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यामुळं आशा बुचकेंव्यतिरिक्त अन्य इच्छुकांची संख्याही मोठी आहे. खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी पक्षश्रेष्ठींचा निर्णय सर्वांवर बंधनकारक असल्याचं म्हटलं आहे.

सोनवणे यांच्या पक्षप्रवेशाच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्यावर त्यांनी “हा पक्ष बाळासाहेबांनी आणि शिवसैनिकांनी उभा केला आहे. त्यामुळे पक्षाची भूमिका, बाळासाहेबांची धोरणं सर्वांनी मान्य करायला हवीत,” असं मत बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं होतं.

“युती होणार की नाही यावर अनेकांनी आपले राजकीय आडाखे बांधून ठेवले होते. शरद सोनवणे यांच्याबाबतही असंच म्हणता येईल. मनसेचा प्रभाव या भागात फारसा नाही. युतीमध्ये जुन्नरची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे शरद सोनवणे हे शिवसेनेला पसंती देतील. ही जागा जर भाजपच्या वाट्याला आली असती तर ते भाजपमध्ये गेले असते. त्यांना केवळ पक्षचिन्हाची गरज आहे. त्यांनी केलेल्या कामांमुळे या भागात त्यांची लोकप्रियता खूप आहे,” असं स्थानिक पत्रकार धनंजय कोकणे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना स्पष्ट केलं.

अमोल कोल्हेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाचा परिणाम

“डॉ अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार की विधानसभेच्या हे निश्चित झालेलं नाही. विधानसभेसाठी कोल्हेंच्या नावाचा विचार होऊ शकतो. जुन्नर तालुक्यात ४० टक्के माळी समाज असल्यानं डॉ. अमोल कोल्हे यांना विधानसभेची उमेदवारी मिळू शकते. मात्र तरीही शरद सोनावणेंचं पारडं जड आहे,” असं मत पत्रकार रायचंद शिंदे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.

Leave a comment

0.0/5