Skip to content Skip to footer

‘वापरा आणि फेकून द्या, हीच काँग्रेसची संस्कृती’

नवी दिल्ली : पुलवामा येथे 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 पेक्षा अधिक जवान हुतात्मा झाले. या प्रकरणावरून काँग्रेसने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे मी अत्यंत दु:खी झालो, असे टॉम वडक्कन यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच ”वापरा आणि फेकून द्या, हीच काँग्रेसची संस्कृती”, असेही ते म्हणाले.

टॉम वडक्कन हे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक असे समजले जात होते. मात्र, आता ते काँग्रेसमधून बाहेर पडले असून, त्यांनी आज केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने बालाकोट येथे एअरस्ट्राईकची कारवाई केली. या कारवाईवर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काँग्रेसच्या प्रतिक्रियेमुळे मी दु:खी झालो आहे. तसेच वडक्कन यांनी काँग्रेसच्या घराणेशाहीवरही टीकास्त्र सोडले. त्याबाबत ते म्हणाले, काँग्रेसची आत्ताची स्थिती वापरा आणि फेकून द्या, अशी झाली आहे.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून वडक्कन हे काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी यापूर्वी कोणतीही निवडणूक लढविली नाही. मात्र, आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपच्या तिकिटावर ते निवडणूक लढवतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a comment

0.0/5