Skip to content Skip to footer

निवडणूक आयोगाची प्रत्येक बाटलीवर नजर

निवडणूक म्हटली की दारूचा ‘पूर’ येतो. प्रचारात दिवसभर दमल्या-भागलेल्या कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी संध्याकाळी नेत्यांकडून ओल्या पार्ट्या दिल्या जातात. हा बाजार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने जोरदार कंबर कसली असून रायगडात दारूच्या प्रत्येक बाटलीवर अक्षरशः नजर ठेवली जाणार आहे. निवडणूक काळात वाईन शॉप, बारमध्ये अचानक वाढलेल्या विक्रीचा हिशेबच मागितला जाणार आहे. यामध्ये दोषी आढळल्यास तत्काळ परवाना रद्द केला जाईल. त्यासाठी जिल्हय़ात 28 समित्यांसह 13 गस्त चौक्यांचा खडा पहारा ठेवण्यात आला आहे.

  • जिह्यात निवडणुकीसाठी 28 समित्या नेमण्यात आल्या आहेत. त्यांना व विविध पथक प्रमुख अधिकाऱयांना सूचना देण्यात आल्या आहेत. स्थिर पथके, भरारी पथके, व्हिडीओ पथके आणि एक निवडणूक खर्चाविषयक पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • शिमगोत्सव, छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी, चवदार तळे येथील कार्यक्रम यामध्ये राजकीय नेते सहभागी होऊ शकतात. मात्र त्यांना त्या उत्सवांच्या अनुषंगानेच भाषणे करावी लागतील, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षाकडून पैशांसह दारूच्या पार्ट्या दिल्या जातात.यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महामार्गावर नाकाबंदी, चेकपोस्ट बसविण्यात येणार आहेत. जिह्यातील वाईन शॉप, बार यांनी चालू व बंद करण्याच्या वेळा पाळाव्यात. याबाबत उत्पादन शुल्क विभागाला सूचना दिल्या असून जिह्यात वाईन शॉप व बार यांची रोजच्या पेक्षा जास्त विक्री निवडणूक काळात वाढली असेल तर त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. तसेच मद्य बनविणाऱ्या कंपन्यांवरही यावेळी नजर ठेवण्यात येणार आहे.

समुद्रकिनारी गस्त वाढवली
समुद्रकिनारी पोलिसांच्या 13 गस्ती चौक्या असून पुलवामा हल्ल्यानंतर त्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्या सक्रिय आहेतच शिवाय काही गुह्यांमध्ये सहभागी असलेल्या 41 जणांना पकडण्यात आले आहे. फरारी गुन्हेगारांचीदेखील यादी तयार असून त्यावरही कारवाई होत आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक पारस्कर यांनी पत्रकारांना दिली.

Leave a comment

0.0/5