सोलापूरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार या दोघांचा एकाच हॉटेलमध्ये मुक्काम असल्याचे वृत्त समोर येताच भाजपाने यावरुन टीकास्त्र सोडले आहे. ‘कर्ता’ आणि ‘करविता’ यांनी एकत्र येणे अगदीच स्वाभाविक आहे कारण “गंगाधर ही शक्तिमान है” हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे, असा चिमटा भाजपाने राज ठाकरे यांना काढला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापूरमध्ये सभा घेतली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. प्रचारसभेनंतर राज ठाकरे हे सोलापूर मधील हॉटेल बालाजी सरोवर येथे पोहोचले. तर शरद पवारही धाराशिव येथील सभा संपवून सोलापूरमधील बालाजी सरोवर या हॉटेलमध्ये पोहोचले. प्रसार माध्यमांमध्ये या संदर्भातील वृत्त झळकल्यानंतर भाजपाने ट्विटरवरुन राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर आपल्या भाषणात टीकास्त्र सोडले आहे. परंतु राज ठाकरे घेत असलेल्या सभेमुळे कुठेतरी भाजपा पक्षाच्या अडचणीत वाढ आणि राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाला फायदा होताना दिसत आहे. त्याचमुळे ‘करता-करविता’ यांनी एकत्र येणे अगदीच स्वाभाविक असून कारण “गंगाधर ही शक्तिमान है” हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे, असे ट्विट भाजपाने मंगळवारी सकाळी केले आहे. सोलापूर येथील सभेत राज ठाकरे यांनी मोदी यांना टीका करताना नरेंद्र मोदी नव-मतदारांना आवाहन केले आहेत की पुलवामाच्या शहिदांच्या स्मृतीसाठी मतं द्या. मात्र शहिदांच्या कुटुंबीयांकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही. इतका निर्लज्ज पंतप्रधान मी कधीच पाहिला नाही यावर भाजपाने ट्विटद्वारे राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती.