Skip to content Skip to footer

दरोडेखोर काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडा साफ करा – उद्धव ठाकरे

गेली साठ-पासष्ट वर्षे काँग्रेस आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी देशावर दरोडा घातला. घोटाळय़ांवर घोटाळे करत राज्यातही बेफाम लुटमार केली. अशा दरोडेखोर काँग्रेस-राष्ट्रवादीचा सुपडा साफ करा असा जबरदस्त घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. वर्षानुवर्षे सत्ता भोगून जे माजलेत ते पाच वर्षांत सुधारले असतील काय, असा सवाल करतानाच अशा कलंकित लोकांची मस्ती उतरवा आणि डिपॉझिट जप्त करून त्यांचे नामोनिशाण मिटवा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी करताच उपस्थित तमाम रायगडवासीयांनी वज्रमुठी उंचावून विजयाचा निर्धार केला. शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची जंगी सभा रायगड मध्ये झाली.

ज्येष्ठ दिवंगत काँग्रेस नेते बॅ. ए. आर. अंतुले यांचे पुत्र नविद अंतुले यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आज भाषण करताना नविद अंतुले यांनी उद्धव ठाकरे यांनी जे प्रेम मला दिले ते मी कधीच विसरणार नाही असे सुद्धा अंतुले यांनी बोलून दाखविले. याच विषयाचा धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी मी हिंदू-मुस्लिम तरुणांच्या विकासासाठी सतत झटत राहीन असे सांगितले. मुस्लिम समाजात शिवसेनेबद्दल जाणूनबुजून गैरसमज पसरवला गेला आहे. पण जो या देशाला आपला देश मानतो तो मुस्लिम असला तरी तो आमचाच आहे ही शिकवण शिवराय आणि शिवसेनाप्रमखांनी आम्हाला दिलेली आहे. आम्ही भगवा घेउन पुढे चाललो आहोत. चलो अब साथ मिलकर आगे जाएंगे असे आव्हान सभेत उपस्थित मुस्लीम समाजाला केले होते.

पुढे राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज शेतकऱ्यांसाठी आणि जनतेसाठी रस्त्यावर उतरलात? आज शेतकऱ्यांच्या नावाने बोंबलत फिरता. तेव्हा पाच वर्षे राज्यात शेतकरी नव्हता काय? निवडणूक आल्यावरच तुम्हाला साक्षात्कार कसा झाला, असा खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी दोन्ही काँग्रेसवर केली होती. शिवसेना-भाजपने पक्ष म्हणून शेतकऱ्यांना मदत केली. पवारसाहेब तुम्ही तुमच्या खिशात हात घातलात का? तुम्ही जनतेच्या खिशात हात घातला असेल असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच प्रचंड हास्याचे वातावरण सभेत निर्माण झाले.

Leave a comment

0.0/5