Skip to content Skip to footer

विधानसभेला रोहित पवार यांची परिस्थिती पार्थ पेक्षा वाईट करू – सुजय विखे-पाटील

आगामी निवडणुकीत पवार आणि विखे पाटील यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे. विधानसभेला रोहित पवार यांची परिस्थिती पार्थ पवार यांच्या पेक्षा वाईट करू असा इशाराच भाजपाचे नवनिर्वाचित खासदार सुजय विखे पाटील यांनी दिलेला आहे. त्यामुळे पवार-विखे यांच्या तिसऱ्या पिढीतील वादाला एकप्रकारे सुरवात झालेली आहे असेच दिसून येते. या वादाची सुरवात खुद्द शरद पवारांनी सुरवात केली होती. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मधून विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. हा तालुका नगर लोकसभा मतदारसंघातच येतो. त्यामुळे या मतदारसंघात रोहित पवार उभे राहिल्यास त्यांच्या विरोधात सुजय विखे सक्रिय होतील याचे हे संकेत मानले जातात.

१९९१ मध्ये बाळासाहेब विखे-पाटील यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविरुद्ध बंड केल्यामुळे त्यांना काँग्रेसचे तिकीट नाकारले. यशवंतराव गडाख यांना उमेदवारी दिली. विखे-पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. काहीही करून विखे-पाटील यांचा पराभव झाला पाहिजे, अशी जबाबदारी राजीव गांधींनी शरद पवारांवर सोपवली. यात गडाख विजयी झाले, पण कोर्टात जाऊन विखे-पाटलांनी गडाखांची खासदारकी घालवली. तेव्हापासून विखे- पवार वाद कायम आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे-पाटीलांसाठी नगरची जागा सोडायला शरद पवार यांनी नकार दिल्यापासून पवार आणि विखे-पाटील यांच्यात नव्याने वाद निर्माण झाला.

Leave a comment

0.0/5