Skip to content Skip to footer

शाहांनी काश्मीरचा ‘भूगोल’ बदलल्यास आश्चर्य वाटायला नको – सामना

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्त्वाखाली जम्मू-काश्मीरमधील विधानसभा जागांचाच भूगोल बदलणार नाही, तर संपूर्ण काश्मीरचाच भूगोल बदलला तरी आश्चर्य वाटणार नाही, असे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’त म्हटले आहे. तसेच काश्मीरचे पुन्हा नंदनवन होवो, अशीही इच्छा सामना,तून व्यक्त करण्यात आली आहे. “कश्मीरात हिंदू मुख्यमंत्री व्हावा व कश्मिरी पंडितांची घरवापसी व्हावी हा नवे गृहमंत्री अमित शहा यांचा अजेंडा असेल तर त्यांनी हाती घेतलेले ‘ऑपरेशन’ हे राष्ट्रीय सत्कार्यच आहे.

शहा यांची विचारसरणी लपलेली नाही.” असे म्हणत ‘सामना’मध्ये पुढे म्हटलंय की, “ममता बॅनर्जींच्या प. बंगालात घुसून त्यांनी ‘जय श्रीराम’ची गर्जना केली व आता जम्मू-कश्मीरात विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचा त्यांचा इरादा दिसत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली फक्त विधानसभा जागांचाच ‘भूगोल’ बदलणार नाही, तर संपूर्ण कश्मीरचा भूगोल बदलला तरी आश्चर्य वाटणार नाही! कश्मीरचे पुन्हा नंदनवन बनो. आतापर्यंत मुसलमानी लोकसंख्येच्या दबावाखाली जम्मू-कश्मीरचे राजकारण चालले होते, असे म्हणत ‘सामना’च्या अग्रलेखातून नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस या पक्षांवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.

जम्मू-कश्मीर खोऱ्यात मुस्लिम ६८.३५ टक्के तर हिंदू २८.४५ टक्के आहेत. शीखदेखील आहेत. मात्र म्हणून कश्मीर काही मुसलमानांना ‘नजराणा’ म्हणून बहाल केलेला नाही. येथील यच्चयावत मुसलमान हे स्वतःस ‘कश्मिरी’ मानत असले तरी ते सर्व हिंदुस्थानचेच नागरिक आहेत व देशाचे कायदेकानू त्यांनाही लागू व्हायला हवेत. त्यासाठी जम्मू-कश्मीरातून ३७० कलम हटवायला हवे. अशीही मागणी ‘सामना’तून करण्यात आली आहे.

Leave a comment

0.0/5