Skip to content Skip to footer

मुख्यमंत्री फडणवीस हे राज्याला लाभलेले गॉड गिफ्ट – गोपीचंद पडळकर

धनगर समाजाचे नेते तथा वंचितचे माजी पदाधिकारी गोपीचंद पडळकर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात प्रवेश केला. वंचित आघाडीला सोडचिट्टी देत पुन्हा भाजपा पक्षात प्रवेश केलेला आहे. मुंबईच्या गरवारे क्लब येथे गोपीचंद पडळकर यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. तर गोपीचंद पडळकर हे बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

भाजप प्रवेश झाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी भाजपाचे कौतुक केले आहे. पडळकर म्हणाले की, मी २०१४ ला भाजपच्या तिकिटावर लढलो मात्र धनगर आरक्षणासाठी मी पक्षातून बाहेर पडून आंदोलन केली. कारण ज्या प्रमाणे पोरग रडल्यावर आई जेवायला देते त्या प्रमाणे आंदोलन केल्यानंतरचं सरकारने आमच्या मागण्या रीतसर पूर्ण केल्या. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याला लाभलेले गॉड गिफ्ट आहे. त्यांच्या कामावर खुश होऊनचं मी भाजपात प्रवेश करत असल्याचे पडळकर म्हणाले.

दरम्यान गोपीचंद पडळकरांनी लोकसभा निवडणूक सांगलीतून वंचित बहुजन आघाडीकडून लढवली होती. तेथे खासदार संजयकाकांच्या बाजूने फार हवा नव्हती, त्यात स्वाभिमानी पक्षाकडून विशाल पाटलांना तिकीट मिळाले आणि लढत चुरशीची बनली. निवडणुकीत संजयकाकांना ५ लाख ८ हजार मतं मिळाली, विशाल पाटलांना ३ लाख ४४ हजार मतं मिळाली तर तब्बल ३ लाख मतं घेत पडळकरांनी भाजपाच्या संजयकाकांचा मार्ग सुकर केला. आता बारामतीत पडळकर अजित पवारांना कशी टक्कर देणार हे पाहावे लागणार आहे.

Leave a comment

0.0/5