Skip to content Skip to footer

शिवसेनेला आणखी एका अपक्ष आमदाराने दिला पाठिंबा

शिवसेनेला आणखी एका अपक्ष आमदाराने दिला  पाठिंबा
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून दहा दिवस उलटून गेले तरी अजून सत्ता स्थापनेचा घोळ सुटलेला नाही आहे. सर्वाधिक संख्याबळ असताना देखील भाजपाने अद्याप सत्तास्थापनेसाठी दावा केलेला नाही. तर शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीला दोन्ही पक्षात ठरल्या प्रमाणे सम-समान सत्ता स्थापनेच्या फॉर्मुल्याची आठवण मित्र पक्षाला करून दिलॆली आहे. ठरल्या प्रमाणे शिवसेना पक्षाकडून पहिल्या अडीच वर्षासाठी मुख्यमंत्री पदाची मागणी केली जात आहे. दोन्ही पक्षाकडून अपक्ष आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न देखील सुरु आहेत.

त्यातच आता अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सोमवारी रात्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर भेट घेऊन शिवसेनेला आपला पाठिंबा दर्शवला. यावेळी शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. त्यामुळे आता शिवसेनेचे संख्याबळ ६४ वर पोहचले आहे. राजेंद्र पाटील यड्रावकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले आहेत. आघाडीने उमेदवारी डावल्यानंतर राजेंद्र पाटील यड्रावकर अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरले. त्यांनी तब्बल ९० हजार ३८ मते मिळवत शिवसेनेचे विद्यमान आमदार उल्हास पाटील यांचा २७ हजार ८२४ मतांनी पराभव केला आहे.

राज्यातील शेतकरी, कामगार, गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा आणि बेरोजगार युवकांना रोजगार शिवसेनाच मिळवून देऊ शकते हा विश्वास असल्यानेच शिवसेनेला पाठिंबा देत आहे. यापुढील काळात शिवसेनेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी असून शिरोळ आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना आणि ओला दुष्काळमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शिवसेनेच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचं आ. राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले आहेत.

Leave a comment

0.0/5