Skip to content Skip to footer

भाजपाची पुन्हा चूक नरेंद्र मोदींना दिली छत्रपतींची उपाधी

भाजपाची पुन्हा चूक नरेंद्र मोदींना दिली छत्रपतींची उपाधी

             भाजपचे नेते भगवान गोयल यांनी काही दिवसांपुर्वी ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ हे पुस्तक लिहिले होते. त्यामुळे भाजपवर बरीच टीका झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली आहे. माजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी एका ट्विटमध्ये मोदींचा उल्लेक छत्रपती असा केल्यामुळे आता पुन्हा एकदा नवीन वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

               दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपच्या नेत्या उमा भारती यांनी ट्विट करत मोदी यांची बाजू उचलून धरली आहे. दिल्ली विधानसभा चुनाव का संदेश असे शीर्षक देत उमा भारती म्हणतात की, “दीड वर्षांपूर्वी विविध राज्यात झालेल्या निवडणूका आणि त्यानंतर झालेली लोकसभेची निवडणूक असेल, सर्व निवडणुकांचे निकाल हेच सांगतात की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याएवढा एकही नेता नाही. संपुर्ण देशातील जनता मोदींच्या सोबत आहे. छत्रपती मोदी जिंदाबाद!”

               उमा भारती यांच्या या ट्विटमुळे आता पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे. आधीच दिल्लीत पराभव झाल्यामुळे भाजपमध्ये मरगळ आलेली असताना उमा भारती यांच्या ट्विटमुळे महाराष्ट्र भाजप नेते अडचणीत येऊ शकतात. विरोधकांनी अद्याप या ट्विटवर आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.

Leave a comment

0.0/5