Skip to content Skip to footer

दादा तुम्ही खेळत रहा वेळ चांगला जाईल, सामानातून चंद्रकांत पाटलांना टोला

दादा तुम्ही खेळत रहा वेळ चांगला जाईल, सामानातून चंद्रकांत पाटलांना टोला

“राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार टिकणार नाही. येत्या डिसेंबर महिन्यात राज्यात मुदतपूर्व निवडणुका होतील” असा दावा करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर येथे एका बैठकीत केला होता. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने समानातून हल्लाबोल केला आहे.“दादा, तुम्ही खेळत रहा, वेळ चांगला जाईल आणि पाच वर्षे कधी पूर्ण झाली हे तुम्हाला कळणारही नाही,” अशा शब्दांत शिवसेनेने त्यांना टोला लगावला आहे.

वाचा सामनाच अग्रलेख..

              विरोधी पक्षाने त्यांच्या भूमिका जोरकसपणे मांडायला हव्यात . पण आम्हाला कोणत्याही मार्गाने सत्ता काबीज करू असे वारंवार सांगणे हे मोदी यांच्या पक्षाला शोभणारे नाही . अटलबिहारी वाजपेयी यांचा भाजप असा नव्हता . बहुमताची सरकारे दाबदबावाने अस्थिर करायची व त्यातून महाराष्ट्रासारख्या राज्यात अराजकाची चूड लावायची हे तंत्र अघोरी आहे . त्यांनी धमकी दिलीच आहे . आता कृती करून दाखवावी . डिसेंबरनंतर ते पुढची तारीख देतील . अशा तारखांवरील तारखा पडतच राहतील आणि पाच वर्षे कधी निघून गेली हे चंद्रकांत पाटील आणि फडणवीसांना कळणार नाही . हा खेळ फारच रंजक आहे . दादा खेळत रहा , वेळ चांगला जाईल !

          लोकशाहीत हार प्रहार पचवायला शिकले पाहिजे. पण महाराष्ट्रातील भाजपच्या कारभाऱ्यांना हे तत्त्व मान्य नाही. राज्यातील नवी घडी त्यांना मान्य नाही. त्याबद्दलचा संताप किंवा निराशा आम्ही समजू शकतो, पण राज्यातील नवी घडी विस्कटूनच टाकायची व अराजक निर्माण करून हा विकृत आनंद घ्यायचाच असे या मंडळींनी ठरवलेले दिसते. राज्याचे भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी अत्यंत खात्रीने सांगितले की, ‘महाराष्ट्रातील सरकार काही टिकणार नाही व येत्या डिसेंबर महिन्यात राज्यात मुदतपूर्व निवडणुका होतील. त्यानंतर सत्ता आमचीच.’ पाटील यांनी जे भाकीत केले ते रस्त्यावरील पोपटवाल्याचे भविष्य आहे, अशी खिल्ली काही मंडळींनी उडवली. पण हा खिल्ली उडवण्याचा विषय नसून गांभीर्याने घ्यावा असा विषय आहे. 

     डिसेंबरमध्ये निवडणुका होणार असे चंद्रकांत पाटील छातीठोकपणे सांगतात ते कुणाच्या भरवशावर आणि इशाऱ्यावर. मुळात पाटील जे सांगतात ते पोपटवाल्याचे भविष्य नसून गर्भित धमकी आहे. राज्यातल्या महाविकास आघाडीकडे चांगले बहुमत आहे. तीन वेगळय़ा विचारांचे पक्ष एकत्र आले, पण हा वेगळा विचार महाराष्ट्राच्या विकासाचा आहे. तीन पक्षांत आपापसात कुरबुरी नाहीत. पाच वर्षे हे सरकार चालेल हे नक्की. भारतीय जनता पक्षाने कितीही तीर मारले तरी माशाचा डावा डोळा काही घायाळ होणार नाही. त्यामुळे एक प्रकारची निराशा येणे स्वाभाविक आहे. मग हे सरकार कसे पाडायचे व मुदतपूर्व निवडणुका कधी घ्यायच्या यावर एखादे कारस्थान शिजवले जात आहे काय? पाटलांच्या बोलण्यातून तेच दिसते.

    डिसेंबरमध्ये मुदतपूर्व निवडणुका घ्यायचे असे भाजपच्या अंतःस्थ गोटात ठरवलेच असेल तर त्यांना आधी संसदीय लोकशाहीचा गळा घोटावा लागेल व महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसावा लागेल. सरकार बहुमताचे आहे. सहा महिन्यांनंतर पुन्हा अविश्वास ठराव आणला तरी १७०चे बहुमत कायम राहील. मग पाटलांचे स्वप्न साकार कसे होणार? राज्यपालांना हाताशी धरून गृहखात्याच्या माध्यमातून त्यांना हे सरकार ‘बेइमानी’ करून बरखास्त करावे लागेल. त्यासाठी थातुरमातूर कारणे शोधावी लागतील. हे ‘पाप’ करण्याचा प्रयत्न ते जेव्हा करतील तेव्हा महाराष्ट्रात आगडोंब उसळल्याशिवाय राहणार नाही.
चंद्रकांत पाटील म्हणतात, डिसेंबरनंतर आमचे सरकार येईल. याचा दुसरा अर्थ असा की, राज्यातील सरकार अस्थिर करण्याचे हरएक प्रयोग करायचे. आमदारांना आमिषे किंवा धाकधपटशा दाखवायचा. मोहिनी प्रयोग करायचे. पण या मोहिनी विद्येस कोणी फशी पडेल असे महाराष्ट्राचे वातावरण नाही. डिसेंबरमध्ये महाराष्ट्राचे सरकार पडेल या स्वप्नातून ते पुढच्या २४ तासांतच दचकून जागे होतील. कारण दिल्ली विधानसभेत भाजपचा पुन्हा दारुण पराभव झाला आहे. आधी दिल्ली जिंकण्याचे बघा, मग महाराष्ट्राकडे वाकडय़ा नजरेने पहा. पाटील यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडले आहे व त्यातून त्यांचे इशारे व धमक्या सुरू आहेत.

Leave a comment

0.0/5